नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या लहवीत गावात रात्रीच्या सव्वा दोनच्या सुमारास मांजरीच्या मागावर असलेला बिबट्या थेट घराच्या छतातून खाली कोसळल्याची घटना घडली. अचानक कोसळलेल्या बिबट्याची घरच्यांना चाहूल लागल्याने ते घरातून बाहेर पडले. त्यामुळे कोणताही अनर्थ घडला नाही. या घटनेची माहिती कळाल्यानंतर मध्यरात्री वनविभागाचे अधिकारी घटने ठिकाणी गेले. पण, ते येण्याच्या अगोदरच बिबट्या या घरातून पसार झाला. त्यानंतर वनविभागाने पहाटेपर्यंत तळ ठोकून बिबट्याचा शोध घेतला. ही घटना शुभम बाळू गायकवाड यांच्या घरी घडली. घरावर बिबट्याने मांजरीमागे पळत असताना उडी मारल्यामुळे घराचा सिमेंट पत्रा तुटला. त्यानंतर तो दरवाज्याजवळ लपुन बसला. त्याचवेळेस घरातील सर्व लोक़ मागची खिडकी तोडून बाहेर पड़ले.