इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – रशियाकडून युक्रेनच्या अनेक शहरांवर बॉम्बहल्ले, क्षेपणास्त्रांचा वर्षाव सुरूच आहे. या भीषण युद्धाचे परिणाम आता दिसू लागले आहेत. युक्रेनमधील अनेक शहरे उद्ध्वस्त झाले आहेत. दोन्ही देशांपैकी कोणीही माघार घेत नसल्यामुळे त्याचे भयानक परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागण्याची चिन्हे आहेत. रशियाच्या सैन्याच्या हल्ल्यात युक्रेनच्या जापोरिज्जिया अणुऊर्जा प्रकल्पात आग लागली आहे. युक्रेनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. रशियाच्या सैन्य जापोरिज्जिया एनपीपी या युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर चारही बाजूने गोळीबार आणि बॉम्बवर्षाव करत आहे. आग आधीच भडकली आहे. जर प्रकल्पातील अणुऊर्जा संयंत्र फुटले तर चेर्नोबिलपेक्षा दहा पटीने अधिक विद्ध्वंस होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
अणुऊर्जा प्रकल्पाजवळ असलेल्या एनरगोदर शहराचे महापौर दिमित्रो ओरलोव्ह आपल्या पोस्टमध्ये सांगतात, स्थानिक सुरक्षारक्षक आणि रशियाच्या सैन्यादरम्यान भीषण युद्ध सुरू आहे. यामध्ये अनेक नागरिक होरपळले आहेत. परंतु किती नागरिकांचा मृत्यू झाला याचा आकडा त्यांनी सांगितला नाही. किव्ह इंडिपेंडेंटच्या वृत्तानुसार, ओडेसा, बिला, त्सेरकवा आणि व्होलिन ओब्लास्टमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील नागरिकांना जवळच्या शेल्टरमध्ये जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. रशियाच्या सैन्याने युक्रेनच्या एका प्रमुख बंदरावर ताबा मिळवला आहे. त्याच्या तटरेषेपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नांतर्गत घेराबंदी केली आहे. रशियाविरुद्ध गनिमी काव्याने युद्ध लढण्याचे आवाहन युक्रेनने आपल्या नागरिकांना केले आहे. डनाइपर नदीवर वसलेल्या एनेरहोदारमध्ये दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरू असताना युद्ध पेटले होते. युरोपात सर्वात मोठ्या अणुऊर्जा संयंत्राचे ठिकाण असलेल्या एनेरहोदारचे महापौर म्हणाले, की युक्रेनचे सैन्य शहराच्या बाहेरील परिसरात रशियाच्या सैन्याविरुद्ध लढत आहे. दिमित्रो ओरलोव्ह यांनी रहिवाशांना आपले घर सोडून जाण्याचे आवाहन केले आहे. युक्रेनला तटरेषेपासून वेगळे केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे. रशियाला क्रिमियापर्यंत देशाच्या सीमेवर एक भूमार्ग बनवण्यासाठी मदत मिळणार आहे.
https://twitter.com/Quicktake/status/1499579316656607232?s=20&t=ajWsEwPFqndNyJRuwo7ZjQ