इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – चित्रपट यशस्वी करण्यासाठी अलीकडे अनेकदा निगेटिव्ह पब्लिसिटीचा फायदा घेतला जाताना दिसतो आहे. प्रदर्शनापूर्वीच अशा पब्लिसिटीचा फायदा शाहरुखच्या ‘पठाण’ला चांगलाच झाल्याचे दिसले. तसेच आता ‘द केरळ स्टोरी’ बाबत होताना दिसते आहे. अभिनेत्री अदा शर्माचा चित्रपट ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटाबाबत जितके वाद होतात, तेवढाच फायदा या चित्रपटाला होताना दिसत आहे. ‘द केरळ स्टोरी’ पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
वीकेंडला तर चित्रपटाच्या कमाईत ३० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाला आधी मर्यादित स्क्रीन्स मिळाले होते. काही राज्यांमध्ये विरोध आणि काही राज्यांमध्ये बंदी आणूनही चित्रपटाला प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. फिल्म बॉक्स ऑफिस कलेक्शनवर काम करणाऱ्या sacnilk या वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, ‘द केरळ स्टोरी’ने तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी १६.५० कोटींची कमाई केली आहे.
माउथ पब्लिसिटीचा चित्रपटाला फायदा
केरळ स्टोरीला माउथ पब्लिसिटीचा मोठा फायदा होत आहे. या चित्रपटाला मिळणार प्रतिसाद पाहता ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट विवेक अग्निहोत्रींच्या ‘द काश्मीर फाईल्स’ला मागे टाकेल असेच दिसते आहे. केरळ स्टोरीच्या पहिल्या दिवसाचे कलेक्शन काश्मीर फाईल्सपेक्षा खूपच चांगले होते. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ने सोमवारी १५ कोटींहून अधिक कमाई केली.
चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, या चित्रपटाला ४ दिवसांत ४६ कोटींहून अधिक कमाई करण्यात यश आले आहे. हा चित्रपट महाराष्ट्र आणि केरळमध्ये चांगला व्यवसाय करत आहे. येत्या काही दिवसांत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा पार करू शकतो, असा अंदाज चित्रपट व्यापार विश्लेषक वर्तवत आहेत. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट अवघ्या ४० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. बजेटची ही रक्कम पहिल्या चार दिवसांत वसूल झाली आहे.
https://twitter.com/AnilKum25570045/status/1652612401395826689?s=20
काय आहे कथा?
केरळमधल्या तीन मुलींची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी या तिघींचं आधी ब्रेनवॉश केलं जातं. नंतर त्यांना ब्लॅकमेल करून बळजबरीने ISIS या दहशतवादी संघटनेत सामील केलं जातं. या चित्रपटातील अभिनेत्री अदा शर्माच्या अभिनयाचं खूप कौतुक होत आहे. केरळ हायकोर्टाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कोणत्याही विशिष्ट समुदायाबद्दल आक्षेपार्ह असं काहीच न दाखवल्याने कोर्टाने स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाचं परीक्षण करून त्याला सर्टिफिकेट दिल्याने थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यासाठी तो योग्य असल्याचं कोर्टाने नमूद केलं आहे. या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इनानी आणि सोनिया बिहानी यांच्या मुख्य भूमिका आहेत.
The Kerala Story Film Box Office Collection