अणू ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती
नवी दिल्ली – केंद्रिय ईशान्य प्रदेश विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पंतप्रधान कार्यालय, कार्मिक सार्वजनिक तक्रारी, निवृत्ती वेतन, अणू ऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज म्हणाले की, मोदींच्या नव भारताने त्याच्या अंतराळ शक्तींमुळे एक उंची गाठली आहे, ज्यामुळे जगातील अग्रभागी असलेल्या सदस्यांमध्ये स्थान प्राप्त करता आले आहे.
वरीष्ठ सरकारी अधिकारी आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) येथील सदस्यांसह झालेल्या बैठकीदरम्यान संबोधित करताना डॉ. जितेंद्र सिंह यांनी दुबई येथील आगामी वर्ल्ड एक्स्पोबद्दल, जेथे भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आणि अंतराळ विभागाच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यासाठी एक विशेष विभाग देण्यात आला आहे, त्याबद्दल माहिती दिली. डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न होते, ज्याने अंतराळ क्षेत्रातील भारताची क्षमता दाखवून दिली आणि इतिहास रचला आहे.
मोदींच्या नेतृत्त्वाखाली भारत हा जागतिक पातळीवर एक प्रमुख राष्ट्र म्हणून उदयास येत आहे, डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, ही एक अभिमानाची गोष्ट आहे की, भारताच्या अंतराळासंदर्भातील असलेल्या विलक्षण क्षमतांमुळेच त्याच्या प्रगतीच्या दिशेने जात असताना मोठ्या प्रमाणात योगदान दिले जाईल. ते म्हणाले की, जगाला आजही चांद्रयान, मंगळ मोहीम आणि आगामी गगनयान याबद्दल आकर्षण आहे.
डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले, पायाभूत सुविधांच्या विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये तसेच सामान्य नागरिकांचे जीवनमान सुलभ करण्यासाठी, मागील सात वर्षांमध्ये अवकाश तंत्रज्ञानामध्ये वापरात येत असलेल्या विविध बाबींना उपयोगात आणण्यात आले आहे. अंतराळ आणि उपग्रह तंत्रज्ञान हे आज रेल्वे, रस्ते आणि पूल उभारणी, कृषी विषयक क्षेत्र, गृह, टेलि-मेडिसीन (दूरस्थ उपचारपद्धती) इत्यादी व्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन आणि हवामानाचा अचूक अंदाज यामध्येही वापरले जात आहे, त्यांनी नमूद केले.