नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, नाशिकचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे हे कामानिमित्त नांदेडला निघाले होते. नाशिक ते नांदेड असा तपोवन रेल्वेने प्रवास करत असतांना एक पैशाने भरलेले पाकिट त्यांना वातानुकूलित डब्यात सापडले. त्यात अनेक बँक कार्ड व पाचशेच्या नोटा होत्या. त्यावरुन ते पाकिट कुण्या सधन व्यक्तीचे वाटत होते. चांदगुडे यांनी ते पाकिट परत करण्याचे ठरविले.
सदरचे पाकिट कुणाचे याची काहीही माहिती मिळत नव्हती. डब्यातील प्रवाशांना विचारल्यानंतर ते कुणाचेही नसल्याचे समजले. क्रेडीट कार्डावरून पियुष कुमावत या व्यक्तीचे ते पाकिट असल्याचे समजले. फेसबुकवरूनही ओळख पटेना. काहीही माहिती उपलब्ध नसतांना त्या प्रवाशांचा त्यांनी मोबाईल नंबर मोठ्या मुस्किलीने शोधला. त्यासाठी त्या डब्यात कुणी कुमावत नावाचे व्यक्ती बसले होते का, हे रेल्वे आधिकाऱ्यांकडून शोधले. मुंबईहुन नाशिकला सदर गृहस्थ उतरले असल्याची माहिती मिळाली. चांदगुडे यांनी पीएनआर नंबरहून प्रवाशांचा मोबाईल नंबर मिळवला. तो पर्यंत रेल्वे निफाड पर्यंत पोहचली होती.
रेल्वे प्रशासनाशी संपर्क करुन मनमाड रेल्वे स्टेशन वरील आधिकाऱ्याकडे (आरपीएफ) कडे ते पाकिट देण्याचे ठरले. त्याप्रमाणे चांदगुडे यांनी ते पाकिट मनमाडचे आरपीएफचे आधिकारी मनोज नाईक यांच्याकडे सुपूर्त केले. नंतर सदर कुमावत प्रवाश्याने मनमाडला येत पाकिट स्विकारले. काही वेळाने कुमावत यांनी पाकिट सुखरुप मिळाल्याचे चांदगुडे यांना सांगितले. महत्वाची कार्ड व पैसे सुरक्षित असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला. चांदगुडे यांच्या प्रामाणिकपणामुळे व पाकिट परत करण्याच्या तिव्र इच्छेमुळे प्रवाशांनी चांदगुडे यांचे अभिनंदन केले.
मोह झाला नाही
मला पैशाचा कोणताही यत्किंचींतही मोह झाला नाही याचे कारण अंनिसचे संस्कार आहे. प्रवाशाने माझे कृष्णा नाव ऐकून गोकुळआष्टमीच्या दिवशी त्यांना खरा कृष्ण भेटल्याची भावना व्यक्त केली.
-कृष्णा चांदगुडे, राज्य कार्यवाह, महाराष्ट्र अंनिस, नाशिक