नाशिक – मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ‘रोटाब्लेटर प्रो’ तंत्रज्ञानाने राज्यातील पहिली ऍन्जिओप्लास्टी यशस्वी करण्यात डॉ. मनोज चोपडा आणि त्यांच्या टिमला यश आले. या उपलब्धीने नाशिकचे नाव वैद्यकीय क्षेत्रात उंचावले आहे. सविस्तर माहिती अशी की, एका ७८ वर्षीय रुग्णाला हृदयविकाराचा त्रास झाल्यानंतर मॅग्नम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रारंभी या रुग्णाला ओपन हार्ट सर्जरीद्वारे (CABG)बायपास करावे लागेल, असे सांगण्यात आले होते. मात्र त्यांना किडनी आणि फुस्फुसाचा त्रास असल्याने रुग्णाला ऍन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय ‘मॅग्नम’चे डॉ. मनोज चोपडा यांनी घेतला. राज्यात प्रथमच रोटाब्लेटर प्रो व आयव्हीएल या अत्याधुनिक तंत्रज्ञानानेयुक्त उपकरणाचा वापर करून शस्त्रक्रिया यशस्वी केली, अशी माहिती मॅग्नम हॉस्पिटलचे संचालक तथा प्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी दिली.
या नव्या तंत्रज्ञानाचा फायदा नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील हृदयरुग्णांसाठी होणार आहे. ऍन्जिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया रुग्णांच्या हृदयातील शिरामध्ये असलेले ब्लॉकेजेस मधून रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी केली जाते. या शस्त्रक्रियेत हृदयाच्या सुक्ष्म शिरेमधील ब्लॉकेजेस काढुन बलून टाकून त्या विस्तारीत करून स्टेण्ट टाकला जातो. ह्या रुग्णामध्ये जास्त कॅल्शिअम युक्त अडथळा ( ब्लॉक ) असल्यामुळे बलुन व स्टेण्ट टाकणे अवघड होते. कॅल्शिअम युक्त अडथळा जास्त असल्यामुळे, कॅल्शिअम युक्त ब्लॉक तोडणे गरजेचे होते. ओ सी. टी. द्वारे नसेच्या आतील चित्रीकणांत सुपरस्पेशियल व अतिरिक्त कॅल्शिअम आढळुन आल्यामुळे दोन तंत्रज्ञान म्हणजेच रोटा प्रो ड्रिलिंग मशीन व आय व्ही एल शॉक वेव्ह लिथोट्रिप्सी बलुन चा वापर करणे महत्वाचे ठरले.
विशेष म्हणजे केवळ ‘1.8 एम एम च्या छोट्या छिद्राद्वारे कॅथेटर आत टाकून रोटाब्लेटरने वरचे कॅल्शिअम ड्रिल केल्यावर आय व्ही एल बलूने शॉक देऊन नसेच्या आतील कॅल्शिअम ब्रेक केला, ह्यामुळे कॅल्शिअम युक्त अडथळा पूर्णपणे मोकळा करण्यात यश आले. त्यानंतर योग्य लांबी रुंदी ठरवून मेडिकेटेड (औषधी ) स्टेण्ट यशस्वीपणे बसविला .अशा पद्धतीने रोटा प्रो आणि आय व्ही एल ह्या दोन तंत्रज्ञांचा वापर करून रुग्णाची ऍन्जिओप्लास्टी यशस्वी करून त्याला एक नवीन जीवदान मिळाले.
नवे तंत्रज्ञान पूर्णपणे डिजिटल कन्सोलमध्ये असून ते डॉक्टरांद्वारे नियंत्रित केले जाते. आधीच्या रोटाब्लेटर उपकरणात पॅडलद्वारे नियंत्रण केलं जात होते, ते नव्या तंत्रज्ञानात अधिक प्रगत करण्यात आले आहे. अशा अत्याधुनिक उपकरणाद्वारे राज्यात प्रथमच ऍन्जिओप्लास्टी करण्यात मॅग्नम हार्ट इन्स्टिट्यूटमधील डॉक्टरांना यश आले. रोटाब्लेटर या तंत्रज्ञानाचा वापर करण्यास डॉ. मनोज चोपडा यांनी १० वर्षांपूर्वी सुरवात केली व देशात अशा पद्धतीने ऍन्जिओप्लास्टी करणारे अगदी बोटावर मोजता येईल असे ठराविक हृदयरोगतज्ज्ञ ह्या तंत्रज्ञानाचा वापर करतात.
शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात डॉ. मनोज चोपडा यांच्या मार्गदर्शनात डॉ.गणेश जगदाळे आणि डॉ. अमित पटेल या तज्ज्ञाच्या टिमला यश आले.