नवी दिल्ली – गेल्या काही दिवसात माध्यमांमध्ये काही वृत्त प्रकाशित झाली आहेत ज्यात म्हटले आहे की स्विस बँकांमधील भारतीयांच्या ठेवीत वाढ झाली असून २०१९ अखेरच्या ६,६२५कोटी रुपयांच्या (CHF ८९९ दशलक्ष) तुलनेत २०२० अखेर २०,७०० कोटी रुपये (CHF २.५५ अब्ज ) इतकी झाली आहे. त्याआधी २ वर्षे यात घसरण झाली होती. गेल्या १३ वर्षातील या सर्वाधिक ठेवी असल्याचे यात नमूद केले आहे. दरम्यान स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी काळा पैसा ठेवल्याच्या माध्यमांमधील वृत्ताचे अर्थ मंत्रालयाने खंडन केले आहे. ठेवीमधील वाढ,घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस प्रशासनाकडून माहिती मागितल्याचेही सांगितले आहे.
याबाबत अधिक स्पष्टकीरण देतांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सांगितले की, बॅंकांनी स्विस नॅशनल बँकेकडे (एसएनबी) नोंदवलेली ही अधिकृत आकडेवारी असून स्वित्झर्लंडमध्ये जमा केलेला कथित काळा पैसा किती आहे हे यात दाखवलेले नाही. या तथ्याचाही माध्यमांनी आडवळणाने उल्लेख केला आहे. शिवाय, या आकडेवारीत भारतीय, अनिवासी भारतीय किंवा इतरांनी स्विस बँकांमध्ये तिसर्या देशातील कंपनीच्या नावे जमा केलेल्या पैशाचा समावेश केलेला नाही.
मात्र , ग्राहकांच्या ठेवीत २०१९ अखेरपासून खरोखरच घट झाली आहे. २०१९अखेरपासून विश्वस्तांच्या मार्फत जमा ठेवीही निम्म्यापेक्षा जास्त आहेत. सर्वात मोठी वाढ “ग्राहकांकडून थकित अन्य रक्कम ” मध्ये झाली आहे. ही रोखे, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या स्वरूपात आहेत.
याकडे लक्ष वेधायला हवे की भारत आणि स्वित्झर्लंडने कर आकारणीच्या बाबींवर परस्पर प्रशासकीय सहाय्य (एमएएसी) वर स्वाक्षर्या केल्या आहेत आणि दोन्ही देशांनी बहुपक्षीय सक्षम प्राधिकरण करारावर (एमसीएए) देखील स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार २०१८ नंतर दरवर्षी वित्तीय खात्याची माहिती सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये स्वयंचलित माहिती आदानप्रदान (एईओआयआय) व्यवस्था कार्यान्वित केली आहे.
वर्ष २०१९ आणि २०२० मध्ये दोन्ही देशांमधील रहिवाशांच्या संदर्भात वित्तीय खात्याच्या माहितीचे आदानप्रदान झाले आहे. वित्तीय खात्याच्या माहितीचे आदानप्रदान करण्याबाबत सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था लक्षात घेता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नामधून स्विस बँकांमध्ये ठेवी वाढण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.
तसेच ठेवींमधील वाढ खालील बाबी स्पष्ट करु शकतील.
– व्यापार विषयक व्यवहार वाढल्यामुळे स्वित्झर्लंडमध्ये भारतीय कंपन्यांमार्फत जमा ठेवींमध्ये वाढ
– भारतात स्थित स्विस बँकेच्या शाखांच्या व्यवसायामुळे ठेवींमध्ये वाढ
– स्विस आणि भारतीय बँकांमधील आंतर-बँक व्यवहारात वाढ
– भारतातील स्विस कंपनीच्या सहाय्यक कंपनीच्या भांडवलात वाढ आणि
– थकित डेरिव्हेटीव्ह आर्थिक साधनांशी संबंधित दायित्वांमध्ये वाढ
माध्यमांमधील या वृत्ताच्या अनुषंगाने ठेवींमध्ये वाढ/घट होण्याच्या संभाव्य कारणाबाबत मतं व्यक्त करण्याची आणि संबंधित तथ्ये पुरवण्याची विनंती स्विस प्रशासनाकडे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने केली आहे.