मुंबई – माजी उपपंतप्रधान व भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बनावट ट्विट करणाऱ्या संबंधितांविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. यानिमित्ताने भाजपा विरोधकांच्या वैफल्याचे दर्शन झाले आहे, असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.
उपाध्ये यांनी पत्रकात म्हटले आहे की, ज्येष्ठ नेते व माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या नावाने बुधवारी एक ट्विट प्रसिद्ध झाले होते. मात्र ज्या ‘@LK_Adwani’ हॅन्डल वरून हे ट्विट करण्यात आले आहे, ते हॅन्डल अडवाणी यांचे नाही, असे प्रसारमाध्यमांना आढळून आले. त्याच बरोबर अडवाणी यांचे ट्विटरवर अकाऊंटच नसल्याचा खुलासा अडवाणी यांचे स्वीय सहाय्यक दीपक चोप्रा यांनी केला आहे.
असे खोटे ट्विट करून सामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांचे भांडे फुटले आहे. या ट्विट मागे असणाऱ्या मंडळींचा शोध घ्या व त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा, अशी मागणी उपाध्ये यांनी केली आहे.