इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क –
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले ट्विटर खरेदी केले आहे. ट्विटर ताब्यात येताच मस्क यांनी भारतीय वंशाचे सीईओ पराग अग्रवाल यांच्याबरोबर पॉलिसी हेड विजया गड्डे आणि चीफ फाइनेंसियल ऑफिसर नेड सेगल यांना काढून टाकले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ट्विटरबाबत मस्कचा वाद सुरू होता. सुरुवातीला ४४ अब्जांची ऑफर देऊन मस्क यांनी ट्विटर खरेदी करणार असल्याची ऑफर दिली होती. परंतू, नंतर पैसे जमेनात म्हणून त्यातून काढता पाय घेतला होता. ट्विटरने न्यायालयात धाव घेताच मस्क यांना एकतर ट्विटर खरेदी करणे किंवा न्यायालयीन कारवाईला सामोरे जाणे असे दोनच पर्याय उरले होते. शुक्रवारी सायंकाळपर्यंत मस्क यांना डील पूर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मस्क यांनी काही गुंतवणूकदारांना सोबत घेऊन ही डील पूर्ण केली आहे. यानंतर जगभरात मस्क आणि ट्विटर याविषयी चर्चा रंगल्या आहेत.
ट्विटर ताब्यात घेताच मस्क यांनी लगेचच आपल्या अकाऊंटवरील बायोडेटावर Chief Twit असे लिहिले आहे. तसेच लोकेशन ट्विटर हेडक्वार्टर असे केले आहे.
७५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ
ट्विटरमधील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या रंगल्या असल्या तरी ट्विटरने अद्याप या अधिकाऱ्यांना काढून टाकण्यावर काही बोलण्यास नकार दिला आहे. मात्र, मस्क यांच्या या पावलामुळे ट्विटरच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. मस्क यांनी ७५ टक्के कर्मचाऱ्यांना नारळ देणार असल्याचे काही दिवसांपूर्वी झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत स्पष्ट केले होते. परंतू नंतर मस्क यांनीच यावर पडदा टाकत कर्मचाऱ्यांना काढणार नाही असे म्हटले होते.
मस्क का म्हणाले ‘लेट दॅट सिंक इन’?
डील पूर्ण करण्यापूर्वी एक दिवस आदी मस्क बेसिन सिंक घेऊन ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले होते. मस्क यांनी द्विटरच्या मुख्यालयात जातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधील व्हिडीओत ते स्वतः चिनी मातीचे बेसिन हातात घेऊन जाताना दिसतात. लेट दॅट सिक इन, असे त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे.