नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सुरु असलेल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाचा युक्तीवाद आज संपला. ठाकरे गटातर्फे आतापर्यंत ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तीवाद केला. आता दुपारनंतर शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल हे युक्तीवाद करणार आहेत. त्यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ महेश जेठमलानी आणि हरिष साळवे युक्तीवाद करणार आहेत. याच आठवड्यात सुनावणी पूर्ण करणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने स्पष्ट केल्यामुळे आता या सत्तासंघर्षाचा निकालही लवकर लागण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी केलेल्या युक्तीवादात राजकीय पक्षाच्या रचनेवर भर दण्यात आला. यात दहाव्या सूचीत उल्लेखाकडेही लक्ष वेधले. पदाधिकारी, प्रमुख नेते, अध्यक्ष असा राजकीय पक्ष असतो. उध्दव ठाकरे हे पक्षप्रमुख असल्याची माहिती वेळोवेळी निवडणूक आयोगाला दिली होती. पक्षाच्या घटनेनुसार नेमणूका झाल्या होत्या.-व्हिप हे राजकीय पक्षातर्फे काढले जातात विधीमंडळ पक्षाकडून नाही असे सांगतू त्यांनी या प्रकऱणात पावलोपावली घटनेची पायमल्ली झाल्याचे सांगितले. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील अभिषेक मनू यांनीही आज युक्तीवाद केला.