ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, परंतु अद्यापही ठाणे असो की पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अनेक तालुके हे विकासाच्या दृष्टीने कोसो दूर आहेत, असे म्हणावे लागेल. कारण या जिल्ह्यांमधील अनेक पाडे, वाडे आणि वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे विशेषतः दुर्गम आदिवासी भागात आरोग्य सुविधा नसल्याने अनेकांना उपचाराअभावी जीव गमावावा लागतो. सध्या देखील मोखाडा तालुक्यात अशीच एक दुर्दैवी घटना घडली.
याचनिमित्ताने आरोग्य सुविधांअभावी नवीन सरकारच्या आरोग्य सुविधांचे धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे. मोखाड्यातील एका गावात आरोग्य सुविधा नसल्यामुळे ही घटना घडली. सर्वांचे काळीज पिळवटून टाकणारी घटना अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोखाडा परिसरात घडली आहे. एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. घरातच प्रसूती झालेल्या या महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. पण दुर्दैवानं या नवजात जुळ्या बाळांचा पहिलाच श्वास अखेरचा श्वास ठरला. प्रसूती झालेल्या महिलेच्या डोळ्यादेखत दोन्हीही निरागस नवजात लेकरांता तडफडून करुण अंत झाला.
धक्कादायक बाब म्हणजे प्रसूती झालेल्या महिलेला चक्क झोळीतून तीन किलोमीटर पायपीट करत उपचारासाठी न्यावं लागले असून गावात आरोग्य सुविधा नसल्यामुळे ही घटना घडली. मोखाडा येथील बोटोशी ग्रामपंचायतीमधील मरकटवाडी इथं घडलेली ही घटना उघडकीस आल्यानंतर हळहळ व्यक्त केली जाते आहे. खरे म्हणजे शनिवारी ही घटना घडली होती. यानंतर ४८ तासांनी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी प्रसूत महिलेची प्रकृती खालावली होती. त्यामुळे अखेर या महिलेला डोलीतून नेत स्थानिकांनी रुग्णालयात पोहोचवले. वंदना बुधर असं प्रसूती झालेल्या महिलेचं नाव आहे. या महिलेला शनिवारी प्रसुती कळा सुरु झाल्या. रुग्णालय गाठणं तेव्हा अशक्य होतं. त्यामुळे या महिलेची प्रसुती घरातच करण्याची वेळ ओढावली.
दरम्यान, घरामध्ये प्रसूत झालेल्या या महिलेच्या दोन्ही मुलांचा प्रसुती दरम्यान, मृत्यू झाला. वेळीच जुळ्या मुलांना उपचार मिळू शकले नाहीत आणि त्यांनी आपल्या आईच्या डोळ्यांदेखतच प्राण सोडला. या घटनेनं वंदना बुधर खचल्या होत्या. प्रसुतीमुळे आधीच शारिरीक थकवा आणि त्यात मुलांचा डोळ्यांदेखत झालेल्या तडफडून मृत्यू, याने वंदना यांच्यावर मोठा आघात झाला. शनिवारी दि. १३ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. मध्ये एक दिवस निघून गेला. पण स्वातंत्र्यदिनी, म्हणजेच काल या महिलेच्या प्रकृतीत बिघाड झाला. प्रकृती खालावत असल्याकारणाने या महिलेला रुग्णालयात दाखल करणं भाग होतं. अखेर गावातीलच इतर लोकांनी या प्रसूत महिलेला एका डोलीमध्ये बसवलं आणि मुख्य रस्ता गाठला. तिथून नंतर एका खासगी वाहनाने या महिलेला दवाखान्यात दाखल करण्यात आलं. सध्या या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, बोटोशी ग्रामपंचायत हद्दीमध्ये आणखी एका गर्भवती महिलेलाही डोली करुन खोडाळा प्राथमिका आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आलं होतं. रस्ता नसल्यामुळे डोली करुन रुग्णांना दवाखान्यात आणण्याच्या पाच घटना याआधीही समोर आल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे आदिवासी दुर्गम भागात विशेषता वाडा मुखडा तालुक्यामध्ये आरोग्य सुविधा तातडीने उपलब्ध करण्यात अशी मागणी या भागातील नागरिकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येत आहे.
Thane Women Twins Baby Birth but
Health Facility Crime