मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वाहनचालक, प्रवाशांना वाहतूक कोंडीतून मुक्ती देण्यासाठी ठाणे ते बोरिवली दरम्यान भूमिगत मार्ग तयार केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी निविदाही काढल्या आहेत. प्रशासकीय स्तरावरील हालचाली पाहता पावसाळ्यापर्यंत काम सुरू होणे अपेक्षित आहे. पण, प्रत्यक्ष वाहतूक सुरू होण्यासाठी मुंबईकरांना किमान ५ वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.
ठाणे ते बोरिवली सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी एक आहे. सध्या हे अंतर कापण्यासाठी सव्वा ते दीड तास लागतो. वर्दळीच्या वेळी दोन तास कधी त्याहूनही अधिक वेळ लागतो. पण, हे अंतर आता २० मिनिटांत कापता येणार आहे. नेहमीच्या वाहतूक कोंडीतून गार्ग काढण्यासाठी भूमिगत मार्ग तयार केला जाणार आहे. या मार्गामुळे मुंबईकर आणि ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबई शहरासह उपनगरांतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायांचाही विचार केला जात आहे. त्यातूनच मेट्रो, मोनो, सागरी सेतू, सागरी मार्ग, जोडरस्ता, उन्नत मार्ग असे पर्याय आज पुढे आले आहेत. भूमिगत मार्गाचीही त्याचाच भाग आहे.
एमएमआरडीए साकारणार प्रकल्प
एमएसआरडीसीने ठाणे- बोरिवली भूमिगत मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. काही कारणांमुळे हा प्रकल्प २०२१ पर्यंत मार्गी लावणे एमएसआरडीसीला शक्य झाले नाही. मात्र या प्रकल्पाची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य सरकारने अखेर हा प्रकल्प २०२१ मध्ये एमएमआरडीएकडे वर्ग केला. सरकारच्या निर्णयानुसार आज एमएसआरडीसीचा मूळ प्रकल्प एमएमआरडीए मार्गी लावत आहे.
११ किमीच्या मार्गात दोन बोगदे
ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा असून या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा मार्ग प्रत्येक बाजून ३ पदरी असा एकूण सहा मार्गिकेचा असेल. प्रकल्पासाठी ११,२३५.४३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. भुयारीकरणासाठी टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.
Thane to Boriwali only in 20 Minutes How