ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्वसामान्य नागरिकांना पोलीसांचे जीवन चांगले वाटत असले तरी पोलीसांच्या नेहमीच्या कामाच्या तणावामुळे जीवनात खूपच ताण असतो, त्यातून मग कौटुंबिक नात्यातही ताणतणाव निर्माण होतात, त्यामुळे पोलिस कर्मचारी असो की आधिकारी हे रागीट व चिडचिडे बनतात, त्यातून मग त्यांच्या हातूनही कधी कधी विपरीत कृत्य घडते. असाच पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. या पोलीस कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे गेल्या काही दिवसांपासून पत्नीसोबत वाद सुरू होते. त्यानंतर पत्नीकडून वारंवार धमकी आणि दबाव टाकला जात असल्याने कर्मचाऱ्याने जीवन संपवण्याचे प्रयत्न केला, असा आरोप हा पोलीस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी केला असून याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
रुग्णालयात उपचार सुरू…
एका चांगल्या कर्मचाऱ्याने अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केल्याने या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावी, अशी मागणी पोलीस बॉइज संघटनेचे उमेश भारती यांनी केली आहे. कल्याण पश्चिमेभागाकडे या पोलीस कर्मचाऱ्याचे कुटुंब राहते. सकाळच्या सुमारास या पोलीस कर्मचाऱ्याने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्याचे नातेवाईक व त्याच्या मित्राने त्याला रुग्णालयात दाखल केले. या पोलीस कर्मचाऱ्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु या आत्महत्येचे अद्याप ठोस कारण कळू शकले नाही.
पत्नीवर चाकूने हल्ला
पती-पत्नींमध्ये सुसंवाद असावा असे म्हणतात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला की वाद होतात मग त्यातून हाणामारीच्याही घटना घडतात. दुसऱ्या एका घटनेत मुंबईच्या खारमध्ये पतीने पत्नीवर चाकूने अचानक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खार पश्चिम परिसरात ही घटना घडली. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. पत्नीवर हल्ला केल्यानंतर पतीने घटनास्थळावरुन पळ काढला. पोलिसांनी जखमी महिलेला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु आहे…..