ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या रेतीबंदर पुलाकडील भागात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे मुंब्रा बायपास मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्याचा थेट फटका कल्याण, भिवंडी, नवी मुंबई, नाशिक या भागात जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना बसणार आहे. कारण, यामुळे मोठ्या वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.
हलक्या वाहनांना मुंब्रा बाह्यवळणऐवजी मुंब्रा शहरातील अंतर्गत रस्त्यातून शिळफाटा, नवी मुंबईच्या दिशेने प्रवेश देण्यात आला आहे. तर अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने जाण्याचे निर्देश वाहतूक पोलिसांनी दिले आहेत. साधारण महिनाभर ही स्थिती कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.
मुंब्रा बायपास पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आज रविवारची सुटी असल्यामुळे या मार्गावर फारशी वर्दळ नाही. मात्र, उद्या सोमवारपासून मुंबईत वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत. उरण जेएनपीटीहून सुटणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक मुंब्रा बायपासवरून गुजरात, भिवंडी आणि नाशिकच्या दिशेने होते. तसेच ठाणे शहरातूनही हजारो वाहने नवी मुंबईत जाण्यासाठी मुंब्रा बायपासचाच वापर करतात.
मुंब्रा बायपास बंद झाल्याने ठाणे वाहतूक पोलिसांनी अवजड वाहनांची वाहतूक पूर्व द्रुतगती महामार्ग, कशेळी- काल्हेर, भिवंडी शहरातून वळविली आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, मुंबई, नवी मुंबई, कल्याण शहरात कोंडीची शक्यता आहे. शिवाय नाशिक, नगरसह अन्य भागातून मुंबई शहरात येणारी वाहनेही मुंब्रा बायपासचाच वापर करतात. आणि या वाहनांनाही मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागण्याची चिन्हे आहेत.
Thane Mumbra Bypass Closed Work Traffic Police Diversion