ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांची चर्चा सुरू झाली आहे. गेल्यावेळी एकत्र लढलेल्या भाजप-शिवसेनेचे आता दोनाचे तीन झाले आहेत. म्हणजे आजी माजी शिवसेना आणि भाजप. अश्यात मतदारसंघांवरून होणारे दावे-प्रतिदावे अखेरच्या क्षणापर्यंत रहस्य कायम ठेवणार आहेत.
महाराष्ट्राचे नेतृत्व करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला ठाणे लोकसभा मतदारसंघ गेल्या निवडणुकीत ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांच्या पाठिशी उभा होता. स्वतः एकनाथ शिंदे त्यांच्या प्रचारासाठी मैदानात होते. दरम्यान, गेल्यावर्षी शिवसेनेत फुट पडली आणि शिंदे वेगळे झाले. आता आगामी लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर शिंदे गटाने म्हणजेच शिवसेनेने ठाण्यावर दावा करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचवेळी ठाकरे गटाकडूनही राजन विचारे पुन्हा मैदानात येऊ शकतात.
परंतु, आतापर्यंत या मतदारसंघाच्या संदर्भात जेवढ्या चर्चा झाल्या, त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काहीही बोलले नाहीत. कारण काही महिन्यांपासून भाजपने या मतदारसंघावर दावा करायला सुरुवात केली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतच भाजपला ठाणे मतदारसंघ हवा होता. परंतु, शिवसेनेसोबत एकत्र लढल्यामुळे त्यांनी राजन विचारे यांच्याकरिता ही जागा सोडली होती. आता मात्र ते पुन्हा एकदा ठाण्यात ठाण मांडण्याचा विचार करण्याची शक्यता आहे.
यांची नावे चर्चेत!
ठाकरे गटाकडून तर राजन विचारे हे नाव जवळपास निश्चित आहे. मात्र त्यांच्या विरोधात शिंदे गटाचा उमेदवार उतरवला तर शिवसेनेचीच मते फुटतील. अश्यात नुकसान होण्याची शक्यता आहे. भाजपकडून विनय सहस्रबुद्धे. संजीव नाईक आणि संजय केळकर ही तीन नावे चर्चेत आहेत. मात्र अद्याप भाजपनेही पत्ता उघडलेला नाही.
हायकमांड म्हणेल तसे
शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून चर्चा सुरू झाल्या आहेत. पण यात शिंदे गटासाठी मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. काही कार्यकर्त्यांनी मात्र भाजप हायकमांडच्या आदेशांनुसारच एकनाथ शिंदे आपली भूमिका ठरवतील, असे म्हटले आहे.
Thane Loksabha Seat Politics BJP Shinde Group