मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ठाणे खाडीच्या स्वच्छतेसाठी एटी कॅपिटल ग्रुपची सेवाभावी शाखा एटी कॅपिटल फाऊंडेशनने (ATCF) पुढाकार घेतला असून ठाणे खाडीतील प्लास्टिक प्रदूषणावर काम करण्यासाठी द ओशन क्लीनअप सोबत ५ वर्षांकरिता भागीदारी करत असल्याचे जाहीर केले. या महत्त्वपूर्ण सहयोगाचा एक भाग म्हणून एटीसीएफ मुंबईतील ठाण्याच्या खाडीच्या एका भागात व्यापक स्वच्छता प्रकल्पासाठी१.५ मिलियन यूरोचे अर्थसहाय्य देणार आहे. प्लास्टिक प्रदूषण दूर करून आशियातील या सर्वात मोठ्या खाडीचे आणि महत्त्वपूर्ण जैवविविधता क्षेत्राचे पुनर्संचयन करण्याचा यामागचा उद्देश आहे. या प्रकल्पांतर्गत दरवर्षी अंदाजे ३८५ टन कचरा रोखला जाईल अशी अपेक्षा आहे.
द ओशन क्लीनअप ही एक आंतरराष्ट्रीय, एका ध्येयाने प्रेरित ना-नफा संस्था आहे, जी पृथ्वीतलावरील महासागरांना प्लास्टिक मुक्त करण्यासाठीचे तंत्रज्ञान विकसित करून त्याचा प्रसार करते.
या प्रकल्पात प्लास्टिकच्या प्रतिबंधासाठी चालता येण्याजोग्या लॉग-बूम सह द ओशन क्लीनअप इंटरसेप्टर सोल्यूशन आणि सुधारित कचरा साठवणुकीसाठी अतिरिक्त इंटरसेप्टर गार्ड बूम एकत्रितपणे वापरण्यात येतील. कचरा काढण्यासाठी डायरेक्ट-टू-शोअर कन्व्हेअर सिस्टमचा उपयोग करण्यात येईल. गोळा करण्यात आलेल्या कचऱ्याचे जबाबदारीपूर्वक व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिकेशी सहयोगाने करण्यात येईल.
वैविध्यपूर्ण वन्यजीवनाला आधार देण्यात ठाणे खाडीची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. यामध्ये भरभरून येणारी मॅनग्रोव्ह ईकोसिस्टम आणि पाणपक्षांच्या अनेक जातींचा समावेश आहे. या महत्त्वपूर्ण नैसर्गिक अधिवासाचे पुनर्संचयन करून भावी पिढ्यांसाठी येथील इकॉलॉजिकल अखंडतेचे रक्षण करणे हा या ठाणे खाडी स्वच्छता प्रकल्पाचा उद्देश आहे.
एटी कॅपिटल ग्रुपचे संस्थापक अरविंद टिकू या वचनबद्धतेच्या लक्षणीयतेवर भर देत म्हणाले, “ठाण्याच्या खाडीला पुनरुज्जीवित करण्यासाठीच्या या दीर्घकालीन संवर्धन प्रकल्पाचा एक भाग होताना आम्ही रोमांचित आहोत. हे प्रायोजकत्व एटी कॅपिटलच्या जगभरात सुरू असलेल्या पर्यावरण, आरोग्य आणि शिक्षण कार्यक्रमांना समर्थन देण्याबाबतच्या धर्मादाय वचनबद्धतेचा एक भाग आहे. हा प्रकल्प म्हणजे मुंबईचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता यांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. बॉयन स्लॅट यांनी २०१३ मध्ये स्थापित केलेल्या द ओशन क्लीनअप सोबत मिळून प्लास्टिकचे प्रदूषण मुळातून काढून टाकण्याच्या बाबतीत मोठा बदल घडवून आणण्याचे आमचे लक्ष्य आहे.”
द ओशन क्लीनअप येथील डायरेक्टर ऑफ पार्टनरशिप्स निशा बक्कर म्हणाल्या, “मुंबईतील आमच्या कामाला पाठबळ देण्यात एटी कॅपिटलचे समर्थन महत्त्वपूर्ण आहे. त्यांची वचनबद्धता आणि आमच्याशी मिळती-जुळती मूल्ये यामुळे आम्ही आपले महासागर, नद्या, जैव विविधता आणि समुदायांसाठी अधिक स्वच्छ, निरोगी भविष्य घडवण्याच्या दिशेने ठोस प्रगती करण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात करू शकलो.”
प्लास्टिक दूर करण्याव्यतिरिक्त, हा उपक्रम स्थानिक समुदायाला विशेषतः कोळी जमातीला पर्यावरणीय शिक्षण, उपजीविकेचे पुनर्संचयन आणि क्षमता वाढवण्याच्या कार्यक्रमांमार्फत आधार देण्याचा प्रयत्न करतो. एटी कॅपिटलची पोर्टफोलियो कंपनी एक्सपीरियन डेव्हलपर्स या स्वच्छता प्रकल्पाच्या कार्यक्रम व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळेल.