ठाणे ( इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील शिवाजी रुग्णालयात उपचाराअभावी ५ रुग्णांचा मृत्यू झाल्याची गंभीर तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी तीव्र आक्रोश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातच अशी स्थिती आहे मग राज्यात काय स्थिती असेल असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे. तसेच, यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड हे आक्रमक झाले आहेत. आव्हाड रुग्णालयात पोहचले. त्यानंतर येथील परिस्थिती बघून त्यांना धक्काच बसला. येथे मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे दाखवून पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात आले. या सर्व घटनेबाबत ट्वीट त्यांनी केले आहे. त्यात त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आव्हाड यांनी ट्वीट म्हटले आहे की, गेली अनेक दिवस झाले ठाण्यातील शिवाजी रुग्णालया बाबतच्या तक्रारी कानावर येत होत्या. आज एका महिलेचा फोन आला की, तिच्या पतीवर उपचार सुरू आहेत, परंतु रुग्णालय प्रशासन त्यांची व्यवस्थित काळजी घेत नाहीये. काय प्रकार आहे हे जाणून घ्यावा म्हणून रुग्णालयात गेलो असता, रुग्णालयात सुरू असणारे प्रकार पाहून मी सुन्न झालो, तळपायाची आग मस्तकात गेली.
त्या महिलेचा पती हा जनरल वॉर्ड मध्ये उपचार घेत होता. तेथे पोहचलो असता,संबंधित रुग्णाला ICU मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याचे समजले. तिकडे गेल्यावर कळाले की त्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तरी तेथील डॉक्टर्स आणि प्रशासन त्या रुग्णावर ५ तास उपचार करत होते. थोडक्यात रुग्ण आधीच दगावला होता परंतु रुग्णालय प्रशासनाने याची काहीही माहिती त्या महिलेला दिली नव्हती. उलट ५ तास त्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचे ते सांगत होते. याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना आणि डॉक्टरांना जाब विचारला असता, त्या प्रशासकीय अधिकारी आणि डॉक्टर लोकांची बोलती बंद झाली.
मेलेल्या रुग्णावर उपचार सुरू असल्याचं दाखवून त्या रुग्णाच्या पार्थिवाला ICU मध्ये नेण्यात येते. तिथे आधीच गंभीर रुग्ण उपचार घेत असतात. या गंभीर रुग्णांना, दगावलेल्या रुग्णामुळे संसर्ग होऊन त्या जिवंत असणाऱ्या रुग्णांचा देखील जीव अजूनच धोक्यात टाकण्यात येतो. आज दिवसभरात या रुग्णालयात ५ रुग्ण दगावले आहे. या रुग्णालयात अक्षरशः गरिबांची फसवणूक आणि लूट सुरू आहे. बिल वाढवून लावली जात आहेत, डॉक्टर वेळेवर कामाला येत नाहीत…इतकंच काय तर मेलेल्या रुग्णांवर देखील उपचार सुरू असल्याचं दाखवून ही मंडळी पैसे कमवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात हा प्रकार सुरू आहे.यात काही कारवाई होईल ही आशा नाहीच..पण गोर गरिबांच्या सोबत हा जितेंद्र आव्हाड स्वतः उभा राहील हा शब्द मी देतो. असे त्यांनी या ट्वीट म्हटले आहे.