मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाण्यातील कळवा महानगरपालिकेच्या रुग्णालयात मृत्यूचे तांडव सुरू असताना राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. एवढ्या मोठ्या घटनेनंतर आवश्यक पावले उचलण्याऐवजी त्यांनी एक विशिष्ट्य निर्णय घेतल्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
ठाण्यातील कळवा येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात १८ लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरही मृत्यूचे तांडव थांबलेेल नाही. साथीच्या आजारांवर उपचार करण्यास सुद्धा सरकारी रुग्णालये सक्षम नाहीत, का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारी रुग्णालयांच्या या अवस्थेवर दोन दिवसांपूर्वी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले होते. सरकारी रुग्णालयांचे चित्र बघून टेंशन येत असल्याचे त्यांनी म्हटले होते. अशात उपाययोजना करणे, आरोग्य यंत्रणा अधिक बळकट कशी होईल याचा प्रयत्न करणे याऐवजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्रभागी आरोग्य संचालकांना कुठलेही कारण न देता पदमुक्त करण्याचा निर्णय दिला. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात आश्चर्य व्यक्त होत आहे.
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता ११ ऑगस्ट रोजी शासननिर्णयाद्वारे डॉ. स्वप्निल लाळे आणि डॉ. नितीन अंबाडेकर यांच्याकडील आरोग्य संचालकपदाचा कार्यभार काढून घेतला आहे. राज्याचे माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. आरोग्य विभागासाठी ‘स्वतंत्र हेल्थ केडर’ निर्माण करण्याचे धोरण शासनाने काही वर्षांपूर्वी मान्य केले होते मात्र त्याची अंमलबजावणी कोणीही आरोग्यमंत्री करत नाही. आरोग्य यंत्रणेतील संचालक, सहसंचालक, अतिरिक्त संचालक यांना प्रशासकीय प्रशिक्षण दिले जात नाही. त्यांना कोणतेही अधिकार दिले जात नाहीत, या शब्दांत त्यांनी सरकारवर नाराजी व्यक्त केली आहे.
हा तर मनमानी कारभार
डॉ. लाळे आणि डॉ. अंबाडेकर हे गेल्या काही महिन्यांपासून अनुक्रमे आरोग्यसेवा संचालक (१) आणि (२) या पदांवर कार्यरत होते. मात्र, आता त्यांना त्यांच्या पूर्वीच्या सहसंचालकपदी काम करण्यास सांगितले आहे. यासंदर्भातील शासन आदेशात कोणतेही कारण दिलेले नाही. डॉ. नितीन अंबाडेकर यांची यापूर्वी दोन वेळा दिल्लीतील ‘एम्स’मध्ये तसेच केंद्रीय आरोग्य विभागात निवड झाली होती. मात्र वरिष्ठांच्या आग्रहामुळे त्यांनी राज्याच्या आरोग्यसेवेत काम करणे पसंत केले होते.
Thane Government Hospital Death Health Minister Action Officers