ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कळवा येथील शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची घटना अत्यंत वेदनादायी आहे सदरची घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. समितीचा अहवाल येईल त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींशी ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.
श्री. शिंदे म्हणाले की, ठाणे येथील रुग्णालयात घडलेली रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आहे. रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत क्रिटिकल स्थितीत दाखल झाले होते, काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भित झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी सदरचे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत.
हॉस्पिटलच्या ऑडिटची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात अतिशय तीव्र नाराजी आणि संतापही व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आज सकाळी उठताच पत्रकारांचे फोन आले की, कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात 17 रुग्ण दगावले. अतिशय वाईट बातमी आहे. पण याची गांभीर्याने दखल ठाणे महानगर पालिका प्रशासन घेईल असे मला काही वाटत नाही. परवा 2 दिवसांपूर्वीचे प्रकरण जर गांभीर्याने घेतलं असत तर आज हे घडलं नसतं. आज टीव्हीसमोर पुढे येऊन काहीजण त्यांची बाजू घेताना दिसत आहेत हे दुर्देव आहेत. जे गेले त्यांच्या घरच्यांना काय वाटत असेल; याची जराही भिती, खंत हॉस्पिटलची बाजू घेणाऱ्यांच्या मनात दिसत नाही. प्रशासनाला याचा जाब विचारायलाच पाहिजे. तसेच या 17 जणांच्या मृत्यूची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी. ह्या संपूर्ण प्रकरणाची तसेच हॉस्पिटलने संपूर्ण हॉस्पिटलचे ऑडिट करून जाहीर करावे अशी राष्ट्रवादी कांग्रेस मागणी करीत आहोत.
thane government hospital death cm eknath shinde
Kalwa NCP Jitendra Awhad Health Treatment