ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या आणि कायम वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या ठाणे येथील कार्यालयात चोरी झाली आहे. चोरट्यांनी येथील एलईडी टीव्ही, एसी, वॉशिंग मशिनस तब्बल साडेचार लाख किंमतीचे साहित्य लंपास केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, दरोडेखोरांनी सदावर्ते यांच्या कार्यालयातील खिडक्यांचे ग्रील कापून आत प्रवेश केला. चोरट्यांनी सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर कापली. कार्यलयामधील स्लायडिंग खिडक्या उचकटून काढल्या. त्यानंतर तेथील सर्व महागड्या वस्तू चोर घेऊन निघून गेलेत. दरम्यान सदावर्ते यांनी ही चोरी डायमंड गँगने केल्याचा आरोप लावला आहे. बंद पडलेल्या कार्यालयांना ही टोळी लक्ष करते आणि त्यातील माल चोरुन भंगारमध्ये विकते.
आपल्याही बंद असणाऱ्या या कार्यालयात याच डायमंड गँगने चोरी केली असून मालही भंगार दुकानात विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, डायमंड गँग वगैरे सक्रिय असल्याच्या सदावर्ते यांच्या आरोपांत तथ्य नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येईल, अशी माहिती वागळे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र राठोड यांनी दिली.
कर्मचाऱ्यांविरुद्ध याचिका
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोर्टात लढणाऱ्या सदावर्ते यांनी जुनी पेन्शन लागू करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाविरुद्ध याचिका दाखल केली आहे. संपामुळे सरकारी रुग्णालयं आणि शाळा- महाविद्यालयांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सदावर्ते यांच्या या भूमिकेविरुद्ध निषेध व्यक्त करत कोल्हापुरात कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पुतळ्याचे प्रतिकात्मक दहन केले आहे.
Thane Adv Gunaratna Sadavarte Office Burglary