मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार सोमवारी दि. १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागामार्फत त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. हद्दवाढीच्या या कार्यवाहीमुळे ठाणे तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती नगरविकास विभागाने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
ठाणे जिल्ह्यातील दहिसर, मोकाशी, वालीवली, पिंपरी, निघू, नावाळी, वाकळण, बामाली, नारीवली, बाळे, नागाव, भंडाली, उत्तरशिव आणि गोटेघर या १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे. त्यानुसार याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने माहे जानेवारी २०२१ ते मे २०२२ कालावधीत मुदत संपणाऱ्या राज्यातील ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र ठाणे तालुक्यातील १४ गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याची कार्यवाही सुरू असल्याने त्याबाबत प्राथमिक अधिसूचना जाहीर झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या जाहीर कार्यक्रमानुसार या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यानंतर हद्दवाढीची कार्यवाही झाल्यास ग्रामपंचायतींचे अस्तित्व संपुष्टात येईल.
नव्याने स्थापित नागरी प्राधिकरणांच्या निवडणुका घ्याव्या लागतील परिणामी निवडणुकीवर दुहेरी खर्च होईल. याबाबी विचारात घेता ठाणे तालुक्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली आहे. यासंदर्भात नगरविकास विभागाचे उपसचिव कैलास बधान यांनी राज्य निवडणूक आयोगाच्या सचिवांना पत्र पाठविले आहे.
आमदार प्रमोद पाटील, गणेश नाईक, रवींद्र चव्हाण, डॉ. बालाजी किणीकर आदी सदस्यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून ही १४ गावे नवी मुंबई महानगरपालिकेत समाविष्ट करून घेण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून गावकरी करीत असून सरकारने त्यांचा निर्णय घेण्याचा आग्रह धरला. ठाणे महानगरपालिकेलगत असलेली ही गावे अगोदर नवी मुंबई महानगरपालिकेतच होती. त्यावेळी गावकऱ्यांनी आंदोलने केल्यामुळे सन २००७ मध्ये ती नवी मुंबई महानगरपालिकेतून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या गावांमध्ये रस्ते, पाणी, दिवाबत्ती यांच्या अडचणी निर्माण झाल्या. या अडचणी दूर करून त्यांना मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी ही गावे पुन्हा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याची मागणी होऊ लागली.
ग्रामस्थांची पुन्हा ही मागणी लक्षात घेता ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यास नगरविकास विभाग सकारात्मक असल्याचे शिंदे यांनी सांगितले होते. त्यामुळे येत्या काही दिवसांत ही गावे महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती. तसेच या गावामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सहा कोटी रुपयांची आवश्यकता असून गावठाणातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी ५९१ कोटींची गरज असल्याचे सांगितले होते.
या १४ गावांचा विकास झालेला नसल्याने पाच ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या १४ गावांनी ग्रामपंचायत निवडणूकीवर बहिष्कार टाकला आहे. सर्व पक्षीय विकास समितीने हा बहिष्काराचा निर्णय घेतला होता. या बैठकीस आमदार पाटील हे उपस्थित होते. त्याचबरोबर सर्व पक्षीय विकास समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील हे उपस्थित होते. या १४ गावांनी गेल्या तीन निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता. ही गावे नवी मुंबईत समाविष्ट करण्यात यावीत अशी ग्रामस्थांची मागणी होती. ही मागणी मनसे आमदार पाटील यांनी उचलून धरली. यानंतर २० ऑगस्ट रोजी पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी राजू पाटील यांनी पत्रव्यवहार केला होता. माहिती घेऊन या गावांचा नवी मुंबई महापालिकेमध्ये समावेश करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली होती. त्यानुसार १२ सप्टेंबर रोजी नगरविकास विभागाने या संदर्भातील आदेश काढला आहे.
Thane 14 Villages are now in New Mumbai Municipal Corporation