मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – संपूर्ण राज्यातच नाही तर देशातच चर्चिली गेलेली आणि उत्कंठा असलेला अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांचा विजय झाला आहे. विविध कारणांमुळे या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या पोटनिवडणुकीत ठाकरे गटाने यश संपादन केले आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आहे. शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. ही निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिवसेनेत मोठी फूट पडली. ठाकरे गट आणि शिंदे गट निर्माण झाले. ठाकरे गटाने दिवंगत रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर केली. पण, ऋतुजा या मुंबई महापालिकेत नोकरी करीत होत्या. निवडणूक लढविण्यासाठी त्यांना महापालिकेतील नोकरीचा राजीनामा देणे आवश्यक होते. त्यांनी तो दिला. पण, महापालिकेकडून तो स्विकारण्यात आला नाही. अखेर हे प्रकरण थेट मुंबई उच्च न्यायालयात गेले. तेव्हा न्यायालयाने महापालिकेला आदेश दिले की त्यांनी राजीनामा मंजूर करावा. त्यानंतर शेवटच्या दिवशी ऋतुजा यांनी उमेदवारी अर्ज सादर केला.
शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या शिंदे गटाने मात्र उमेदवार दिला नाही. त्यांनी त्यांचा मित्र पक्ष असलेल्या भाजपला पाठिंबा दिला. भाजपने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजप नेत्यांना पत्र लिहिले. त्यात मागणी केली की ऋतुजा यांना बिनविरोध निवडून द्यावे आणि आपला उमेदवार मागे घ्यावा. त्याची दखल घेत भाजपने मुरजी पटेल यांची उमेदवारी मागे घेतली. मात्र, ठाकरे गटाला सहानुभूती मिळू नये तसेच पहिलाच मोठा विजय प्राप्त झाल्यास त्या गटाचे मनोबल वाढेल ही बाब लक्षात घेऊन राजकीयदृष्ट्या भाजपने उमेदवार मागे घेतला.
तत्पूर्वी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे दोन्ही गटांच्या वादामुळे गोठविण्यात आले. ठाकरे गटाला पेटती मशाल तर शिंदे गटाला ढाल तलवार ही निशाणी निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. त्यामुळे ऋतुजा लटके या पेटत्या मशालीच्या निशाणीवर ही निवडणूक लढत आहेत. शिवसेना फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने त्याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
भाजपने उमेदवारी मागे घेतली पण अन्य अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या उमेदवारांनी माघार न घेतल्याने ऋतुजा यांच्यासह रिंगणात एकूण ७ उमेदवार राहिले. परिणामी, या निवडणुकीत मतदान झाले. मतदारांच्या निरुत्साहामुळे केवळ ३१ टक्केच मतदान झाले. दरम्यान, भाजपने उमेदवारी माघार घेतल्यानंतर प्रचार मात्र नोटाचा केल्याचे बोलले जात आहे. नोटाला सर्वाधिक मते मिळाली तर लटके यांच्या विजयाचा मार्गही अडचणीचा ठरु शकतो. त्यामुळे उघडपणे उमेदवार मागे घ्यायचा मात्र पडद्यामागे नोटाचा प्रचार करुन ठाकरे गटाच्या अडचणी वाढवायचा अशी रणनिती भाजपची असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात आहे. मतमोजणी आज सकाळी सुरू झाली. आणि अखेर लटके यांचा विजय झाला आहे. उमेदवारांना मिळालेली मते अशी
१) श्रीमती ऋतुजा लटके: ६६५३०
२) श्री. बाला नाडार : १५१५
३) श्री. मनोज नायक : ९००
४) श्रीमती नीना खेडेकर : १५३१
५) श्रीमती फरहाना सय्यद : १०९३
६) श्री. मिलिंद कांबळे : ६२४
७) श्री. राजेश त्रिपाठी : १५७१
नोटा : १२८०६
एकूण मते : ८६५७०
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवार ऋतुजा रमेश लटके यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल मनःपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन! https://t.co/bye1USjuiO
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) November 6, 2022
Thackeray Group First Victory Rutuja Latake Win
Andheri By Poll Assembly Election