नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाविकास आघाडी सरकार कधी कोसळणार याची माहिती तत्कालीन उर्जामंत्री नितीन राऊत यांना आधीच होती, अशी चर्चा आता रंगली आहे. २१ जून रोजी एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह सूरतवरुन गुवाहाटीला पोहोचले होते. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकारचे भविष्य अधांतरी होते. तत्कालीन उर्जामंत्री नितीन राऊत यांना कदाचित अगोदरच सर्व काही समजले होते असे म्हणले जात आहे. त्यामुळेच त्यांनी २० जून रोजी लिहिलेल्या पत्रात त्यांचा कार्यकाळ २९ जूनपर्यंतच राहील, असे स्पष्ट केले होते. या पत्रावरुनच सरकार कधी कोसळणार हे नितीन राऊत यांना आधीच माहिती होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
३० जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. तोपर्यंत सरकारबाबत अनिश्चिततेचे वातावरण होते. यादरम्यान, नितीन राऊत यांनी आपल्या कार्यकाळात झालेल्या कामांवर कॉफी टेबल बुक प्रकाशित करण्यासाठी २० जून रोजी उर्जा विभागाच्या प्रधान सचिवांना पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी सांगितले की, ६ जानेवारी २०२० रोजी त्यांनी उर्जामंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला. तर २९ जून २०२२ रोजी मंत्रिपद समाप्त होत आहे.
९०६ दिवस ते उर्जामंत्री राहिले. त्यांच्या कार्यकाळात महाजेनको, महावितरण, महापारेषण, महाउर्जा आणि मुख्य विद्युत निरीक्षक आदी कंपन्यांमध्ये आमूलाग्र सुधारणा करण्यात आली. यावर सर्व कंपन्यांनी एकत्रित माहिती तयार करायला हवी. वीजदर कमी करण्याचा दावाही त्यांनी या पत्रात केला आहे. यासंदर्भात कॉफी टेबल बुक प्रकाशित करायला हवी, असे राऊत यांनी पत्रात स्पष्ट म्हणले आहे. विशेष म्हणजे, या काळात सरकारला काहीही होणार नाही असा दावा तत्कालीन सरकारमधील ज्येष्ठ नेते करत होते.
Thackeray Government Congress Leader Letter
Nitin Raut Mahavikas Aghadi Mahaalliance