पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्याकडून जप्त करण्यात आलेले दागिणे परत करण्याचे आदेश न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलिसांना दिले आहेत. शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) संदर्भातील गैरव्यवहारात ते आरोपी आहेत. अपात्र उमेदवारांना पैसे घेऊन पात्र ठरविल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.
पोलिसांच्या कारवाईत सुपे यांच्याकडून एकूण दोन कोटी ६४ लाख रुपयांची रोख आणि जवळपास ६५ लाखांचे दागिणे जप्त करण्यात आले होते. सुपे कुटुंबीय आणि त्यांच्या नातेवाईकांकडून हे सोन्याचे दागिणे जप्त करण्यात आले होते. सुपे कुटुंबीयांचे दागिने परत करावेत, अशी विनंती सुपे यांचे वकील ॲड. मिलिंद पवार आणि ॲड. अक्षय शिंदे यांनी युक्तीवादात केली. त्यानंतर बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी सुपे कुटुंबीयांकडून जप्त करण्यात आलेले दागिने परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
सुपे कुटुंबीयांच्या घरातून जप्त करण्यात आलेले दागिने त्यांच्या मालकीचे तसेच वापरातील आहेत. सगळे दागिणे पत्नी, मुलगी, मुलगा, सून, जावई यांचे आहेत. दागिणे पोलीस ठाण्यात जमा असून पडून राहिले तर नुकसान होईल. त्यामुळे खटल्याच्या निकाल लागेपर्यंत जप्त दागिणे आहे तसेच ठेऊ, अशी हमी न्यायालयाला देऊ, असा युक्तिवाद सुपे यांच्याकडून करण्यात आला होता.
दोन वर्षांपूर्वी अटक
शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहारात पुणे सायबर गुन्हे शाखेने तुकाराम सुपे यांना १७ डिसेंबर २०२१ ला अटक केली होती. त्यानंतर त्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईकांची चौकशी करण्यात आली होती. यामध्ये पत्नी, जावई, मुलगा आदींचा समावेश होता.
कागदपत्रेही जप्त
सुपे यांच्या कुटुंबियांची आणि नातेवाईकांची झडती घेतल्यानंतर ६५ लाख १३ हजार ८०० रुपयांचे दागिणे जप्त करण्यात आले होते. सुपे यांच्या पत्नीने बँकेत ठेवलेल्या मुदत ठेवीच्या पावत्या तसेच जमीन खरेदी प्रकरणातील कागदपत्रे जप्त करण्यात आली होती.
TET Scam Suspected Tukaram Supe Gold Ornaments Court Order