मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामध्ये कृषी मंत्री अब्दुल सत्तारांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. आता निवडणूक प्रतिज्ञापत्रावरुन त्यांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सिल्लोड प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कोर्टाने मंत्री अब्दुल सत्तार यांची या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आदेश पोलिसांना दिले आहेत. पोलिसांना सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल द्यावा लागणार आहे.
टीईटी घोटाळ्याबाबत रोज नवनवीन माहिती समोर येत असून, अब्दुल सत्तार यांच्याबाबतीतही अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. सत्तार यांच्या ज्या मुलींचे नाव टीईटी घोटाळ्यात आली होती आता त्यांचे वेतन थांबवण्याचा आदेश शिक्षण विभागाने काढला आहे. सत्तार यांच्या मुली शेख हीना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख ऊझमा नाहीद अब्दुल सत्तार या दोन्हीचे वेतन थांबवण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावरून अनेक आरोप – प्रत्यारोप करण्यात येत होते. त्यानंतर आता शिक्षण विभागाने टीईटी परिक्षेतील बोगस उमेदवारांचे वेतन थांबवण्याचे आदेश काढले आहे. प्रशासनाने एकूण १ हजार ३३ शिक्षकांचे वेतन थांबवण्याचा आदेश काढला आहे. ज्यात ५७६ शिक्षक हे प्राथमिकचे तर ४५७ शिक्षक माध्यमिकचे आहेत. विशेष म्हणजे याच वेतन थांबवण्याच्या यादीत अब्दुल सत्तार यांच्या मुली शेख हीना कौसर अब्दुल सत्तार आणि शेख ऊझमा नाहीद यांचे सुद्धा नाव आहे.
सिल्लोडमधील महेश शंकरपेल्ली आणि पुण्यातील डॉ अभिषेक हरिदास यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार आणि इतर विरोधात तक्रार दाखल केली होती. सत्तार यांनी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथ पत्रात शेतजमीन, बिगरशेती जमीन, वाणिज्य इमारती, निवासी इमारती, शैक्षणिक अहर्तेबाबत तफावत असलेली माहिती सादर केली होती. याबाबत अभ्यास करून महेश शंकरपेल्ली आणि डॉ अभिषेक हरिदास यांनी केस दाखल केली.
या केसमध्ये सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना सीआरपीसी २०२ अंतर्गत तपासाचे आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोलिसांनी अहवाल देखील सादर केला होता. परंतु पोलिसांनी भ्रामक, त्रुटीयुक्त अहवाल देऊन अभय दिले असल्या बाबत फिर्यादींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. सिल्लोड न्यायालयाने पोलिसांना पुनश्च सखोल चौकशी करून ६० दिवसात अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.
TET Exam Scam Minister Abdul Sattar Trouble
Election Affidavit Daughters Salary