मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यभरात टीईटी परीक्षा घोटाळा प्रचंड गाजतो आहे. या प्रकरणात घोटाळा केल्याचा आरोप असलेले आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांचं निलंबन राज्य सरकारने केले होते. आता मात्र हे निलंबन मागे घेण्यात आले आहे. खोडवेकर यांना पुन्हा एकदा प्रशासकीय सेवेत रुजू करुन घेण्यात आले असून महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सुशील खोडवेकर हे मूळचे परळी तालुक्यातील खोडवा सावरगाव येथील असून ते मुंबईत वास्तव्यास आहेत. ते २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. टीईटी परीक्षेत गैरव्यवहार झाला तेव्हा ते शालेय शिक्षण विभागामध्ये उपसचिव होते. टीईटी प्रकरणामध्ये अटक झालेले परीक्षा परिषदेचे माजी अध्यक्ष तुकाराम सुपे यांच्या संपर्कात असल्याने खोडवेकर यांना पुणे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच त्यांचे निलंबनही करण्यात आले होते.
आता मात्र हे निलंबन मागे घेण्यात आले असून त्यांना पुन्हा सेवेत रुजू करुन घेण्यात आले आहे. दरम्यान, टीईटी घोटाळ्यातील मुख्य आरोपी तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली होती. या प्रकरणी पेपर फुटीचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. मात्र त्यांना ३१ मे रोजी जामीन मिळाला होता तसेच त्याच दिवशी ते निवृत्त झाले होते.
७८०० जणांकडून पैसे घेऊन पास केल्याचे उघड..
टीईटी परीक्षा २०१९ – २० या बनावट वेबसाईटवर निकाल प्रसिद्ध करून जवळपास साडेपाचशे ते सहाशे अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचा आरोप या घोटाळ्यामध्ये सुरुवातीला होता. मात्र पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासामध्ये तब्बल ७८०० जणांना पैसे घेऊन पास केल्याचे उघड झाले आहे. या ७८०० विद्यार्थ्यांना अपात्र ठरविण्यात येणार असून त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना भविष्यात शिक्षक पात्रता परीक्षा देण्यास मनाई करण्यात आली आहे. बोगस पद्धतीने पात्र झालेल्या या ७८०० विद्यार्थ्यांपैकी शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्यांचा शोधही घेण्यात येणार आहे. शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या अशा सर्व शिक्षकांना सेवेतून बडतर्फ करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.
TET Exam Scam IAS Officer Sushil Khodvekar Suspension Cancel