पुणे(इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गेल्या वर्षीच्या टीईटी परीक्षा घोटाळ्यात दिवसेंदिवस अनेक बाबी समोर येत आहेत. याप्रकरणी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे यांना मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अटक केली. त्यानंतर या घोटाळ्यात कन्नडचे आमदार आणि सध्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलींचीही नावे आली. हा धुराळा थांबत नाही तोच आता एक बाब समोर आली आहे. ती म्हणजे, शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचे नावेही या घोटाळ्यात आले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
टीईटी अर्थात शिक्षक पात्रता परिक्षेत सुपे यांनी अपात्र झालेल्या उमेदवारांना देखील पैसे घेऊन पास केले असल्याचे उघड झाले. परीक्षेचा पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या जी. ए. टेक्नॉलॉजी कंपनीचा प्रमुख प्रितेश देशमुख याच्या पिंपरी-चिंचवडमधील घरातून पुणे सायबर पोलिसांना टीईटी परीक्षेची कागदपत्रे सापडली. त्यामुळे टीईटीच्या परीक्षेत घोटाळा झाल्याचे स्पष्ट झाले. सुपेसोबतच शिक्षण आयुक्तांचा सल्लागार अभिषेक सावरीकर यालाही पोलिसांनी अटक केली.
औरंगाबादच्या एका शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव या घोटाळ्यात आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे यापूर्वी कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या मुलांची नावे समोर आली असतांना आता एका मोठ्या शिक्षण अधिकाऱ्याच्या मुलीचं नाव या यादीत आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. त्याचवेळी आता दुसरीकडे खुद्द औरंगाबादचे शिक्षण अधिकारी मधुकर देशमुख यांच्याच मुलीचे या टीईटी घोटाळ्यात नाव आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या पाच हजार सातशे उमेदवारांच्या गुणामध्ये फेरफार करून अपात्र असतांना देखील अंतिम निकलामध्ये पात्र जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये देशमुख यांच्या मुलीचे नाव आहे.
सन 2019 मध्ये झालेल्या टीईटी परीक्षेत तब्बल 7800 विद्यार्थी बोगस पद्धतीने पात्र ठरल्याचं पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं होते त्यामुळे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडून या 7800 बोगस शिक्षकांची नावे जाहीर करण्यात आली असून त्याची यादी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. मात्र ज्या शिक्षण अधिकाऱ्यांना टीईटी परीक्षेतील उमेदवार पडताळणीचे अधिकार आहेत त्यांच्याच मुलीचे आता बोगस उमेदवाराच्या यादीत नावं आले आहे.
या प्रकरणात ज्यामुलीचे टीईटी परीक्षेतील बोगस उमेदवाराच्या यादीत नावं आले आहेत ते मधुकर देशमुख हे औरंगाबाद माध्यमिकचे शिक्षण अधिकारी आहेत. विशेष म्हणजे टीईटी पात्र उमेदवारांची पात्रता पडताळणी करण्याचा अधिकार देशमुख यांना आहे. त्यामुळे यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी नुपूर देशमुखवर कायमस्वरूपी प्रतिबंध करण्याचा आदेश प्रशासनाने काढला आहे.
महत्वाचे म्हणजे टीईटी पात्र उमेदवारांच्या पात्रेतची पडताळणी करण्याची जवाबदारी देशमुख यांच्यावर होती. मात्र पात्र नसतानाही पात्र असल्याच्या यादीत त्यांच्या मुलीचं नाव आले आहे. त्यामुळे देशमुख यांच्या मुलीचे नाव पात्र यादीत कसं आलं आणि ते कुणी आणलं याची चौकशी करण्याची गरज आहे. मात्र दरम्यान देशमुख यांनी या प्रकरणाचा इन्कार केला आहे.
TET Exam Scam Education Officer Daughter Name
Fraud Crime