मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाराष्ट्रातील शिक्षक भरती घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सिल्लोडचे आमदार व विद्यमान मंत्री अब्दुल सत्तार यांच्या दोन मुली व एका मुलाचे नाव या घोटाळ्यात समोर आले आहे. ईडीने त्यांच्यावर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सत्तांरांच्या अडचणी वाढणार आहेत.
कमी गुण मिळालेल्या ७ हजार ८८० उमेदवारांचे गुण वाढवून त्यांना शिक्षक म्हणून भरती करण्यात आल्याचा घोटाळा २०२० मध्ये उजेडात आला होता. तसेच सार्वजनिक आरोग्य विभागातील वर्ग ड श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती तसेच म्हाडामधील कर्मचाऱ्यांच्या भरती प्रकरणी आता ईडीने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करत चौकशी सुरु केली. याबाबत अब्दुल सत्तार यांना विचारले असता त्यांनी घोटाळ्याविषयीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
तसेच टीईटी परीक्षा न देता देखील यादीत नावे आली असून, यादीत नावे टाकली त्यांच्यावर कारवाई करा असे सत्तारांनी म्हटले आहे. या प्रकरणाची सत्यता पडताळली पाहिजे असेही सत्तार यांनी म्हटले आहे. माझी बदनामी करण्यासाठी कोणीतरी खोटी बातमी चालवत आहे त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करणार असल्याचे अब्दुल सत्तारांनी स्पष्ट केले आहे. कायद्यानुसार त्यामध्ये काही चूक असेल तर त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने होईल, असेही ते म्हणाले.
या प्रकरणात माझ्या परिवाराची चूक असेल किंवा मी फायदा घेतला असेल, तर मी गुन्हेगार आहे. मात्र या यादीमध्ये ज्यांनी नावे टाकली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल असे देखील सत्तार यावेळी म्हणाले. पुणे पोलिसांनी शिक्षण विभागात उपसचिवपदी काम केलेल्या आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना अटक केली. खोडवेकर यांना निलंबित केल्यानंतर गेल्याच आठवड्यात त्यांना पुन्हा रुजू करुन घेण्यात आले आहे. महाराष्ट्र वैधानिक मंडळाचे सदस्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
TET Exam Scam ED FIR Registered
Maharashtra Fraud Investigation Crime