पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) मधील गैरव्यवहाराची व्याप्ती राज्यभर असल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी आता पुणे पोलिसांनी नाशिक आणि चाळीसगावमधून दोघांना अटक केली आहे. नाशिकमधील आरोग्य विभागात कार्यरत असलेला टेक्निशिअन आणि जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा एक शिक्षक यांचा त्यात समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून टीईटी परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलिस करीत आहेत. अटक केलेल्यांकडून तसेच तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे पुणे सायबर पोलिसांनी नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात अटकसत्र सुरू केले आहे. या गैरकारभारातील मुख्य आरोपींना तब्बल पावणे चार कोटी रुपये दिल्याचा आरोप केला जात आहे. नाशिक आणि चाळीसगावमधील दोघांनी तब्बल ३५० हून अधिक परीक्षार्थींकडून पैसे घेतले. यांनी एकूण ३ कोटी ८५ लाख रुपये एजंटांमार्फत मुख्य आरोपींना दिल्याचे पुणे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. याप्रकरणी पोलिस कसून तपास करीत आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारातील अनेक बाबी दिवसेंदिवस उघडकीस येत आहेत.