मुंबई – आपण छान एका जागेवर बसून राहावे आणि नोकराने बसल्या जागी सगळे आणून द्यावे, अशी स्वप्न आपण रंगवतो. पण नोकर ठेवणे, त्याला महिन्याचा पगार देणे परवडणारे नाही. पण टेस्ला कंपनीने ही सोय कायमची करून दिली आहे. आता टेस्लाने तयार केलेला रोबोच एखाद्या नोकरासारखा काम करेल, अशी घोषणा कंपनीचे सीईओ आणि जगविख्यात उद्योजक एलन मस्क यांनी केली आहे.
एलन मस्कने सांगितले आहे की, टेस्लाने एक ह्युमनॉईड रोबो तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा रोबो तुमच्या घरी नोकरासारखा काम करेल. पुढील वर्षीपर्यंत त्याचा प्रोटोटाईप सुद्धा तयार करण्यात येणार आहे, असे मस्क यांनी सांगितले. विशेष म्हणजे हा रोबो अतिशय अवघड आणि कंटाळवाण्या कामासाठी डिझाईन तयार करण्यात आला आहे.
ज्या कामांचा लोकांना कंटाळा येतो, अशी कामे हा रोबो करेल. हा रोबो ५.८ फूट लांब आणि १२५ पाऊंड वजनी असणार आहे. हा रोबो कारचे नटबोल्ट कसण्यापासून किराणा आणण्यापर्यंतची कामे करण्यास सक्षम राहील. टेस्लाच्या कारखान्यांमध्ये आटोमेटेड मशीन आणि अनुभवाचा फायदा या रोबोला मिळेल. त्यादृष्टीने विशेष पद्धतिने त्याची निर्मिती सुरू आहे.
रोबो नव्हे मित्रच
मस्कचे म्हणणे आहे की, हा रोबो माणसाच्या मित्रासारखाच असेल. पण तो माणसावर वरचढ होऊ शकणार नाही. रोबोमध्ये चेहऱ्यासारखा एक स्क्रीन लावण्यात येईल. टेस्लाने सध्या याच्या अधिकृत लॉन्चिंगची घोषणा केलेली नाही.
मजुरांची उणीव भासणार नाही
या रोबोचा अर्थव्यवस्थेवर मोठा प्रभाव पडेल, असा इशारा मस्कने दिला आहे. त्याला माफक दरात उपलब्ध करून देणे कंपनीच्या फायद्याचे आहे. मजुरांची उणीव भासणार नाही. याचा एक प्रोटोटाईप पुढील वर्षी उपलब्ध व्हायला हवा, अशी अपेक्षा मस्कने व्यक्त केली आहे.