नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जम्मू-काश्मीर मधील फुटीरवादी आणि माजी दहशतवादी यासिन मलिक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण एजन्सी (एनआयए)च्या विशेष न्यायालयाने टेरर फंडिंग प्रकरणी ही शिक्षा सुनावली आहे. यासीन मलिकला दोन खटल्यांमध्ये जन्मठेपेची आणि पाच प्रकरणांमध्ये १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सर्व शिक्षा एकाच वेळी चालतील आणि जास्तीत जास्त शिक्षा जन्मठेपेची आहे.
शिक्षा सुनावल्यानंतर यासिन मलिक शांत बसलेला दिसला. यासिन मलिकला शिक्षा सुनावल्यानंतर काश्मीर खोऱ्यात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. यासिन मलिकच्या घरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर न्यायालयाच्या आवारातील सुरक्षा व्यवस्थाही अत्यंत कडेकोट असून, निकालापूर्वी श्वानपथकामार्फत पाळत ठेवण्यात आली होती.
यासिन मलिकवर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग, दहशतवादी फंडिंग, दहशतवादी कट रचणे आणि भारताविरुद्ध युद्ध पुकारणे अशा अनेक आरोपांवरून गुन्हे दाखल आहेत. यासिन मलिक हा माजी गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या कन्या, भारतीय हवाई दलाच्या चार निशस्त्र अधिकाऱ्यांच्या अपहरणासह इतर अनेक प्रकरणांमध्ये आरोपी आहे.
एनआयएने टेरर फंडिंग प्रकरणी दोषी यासीन मलिकला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. यासिनने केलेले गुन्हे लक्षात घेता त्याला फाशीपेक्षा कमी शिक्षा देऊ नये, असे एनआयएने म्हटले आहे. यासिन मलिकने स्वत: या खटल्याच्या सुनावणीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला होता आणि वकीलही परत केला होता. यासिन मलिकची शिक्षा जाहीर होण्यापूर्वी पटियाला हाऊस न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट होती.
सुनावणीदरम्यान यासिन मलिक म्हणाला की, मी एका दशकाहून अधिक काळ हिंसाचारापासून दूर आहे. यासिनचे वकील फरहान म्हणाले, ‘मी देशाच्या 7 पंतप्रधानांसोबत काम केले आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही त्यांचा पासपोर्ट परत मिळवून दिला होता. यासिन मलिकच्या वकिलाने सांगितले की, जेव्हा त्याने आपल्या गुन्ह्यांची प्रांजळपणे कबुली दिली आहे आणि हिंसेचा मार्ग सोडला आहे, तेव्हा त्याच्या शिक्षेत सौम्यता असली पाहिजे.
https://twitter.com/ANI/status/1529443251727413249?s=20&t=7jcgfhWKorbIwPiwqGJazQ