गाझा (पॅलेस्टाईन)
गाझावर इस्त्राईलने सुरू केलेले हवाई हल्ले आणि रॉकेटच्या आगीच्या धाकाने हजारो नागरिकांनी पलायन सुरू केले आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सतत हल्ल्यांमुळे गाझाची परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. अनेक इमारती कोसळल्या आहेत. आता तर वीज-पाणी संकटही गंभीर बनले आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या म्हणण्यानुसार, गाझामध्ये २ लाख ३० हजार नागरिकांना पाणी मिळण्यात अडचण येत आहेत. वीजदेखील मिळू शकत नाही. त्यामुळे स्थलांतर आणखी वाढले आहे. सोमवारपासून १० हजार पॅलेस्टाईन नागरिक गाझा येथील घरे सोडून गेले आहेत.
गाझावरील इस्त्रायली हल्ल्यांमुळे एपी, अल जजीरा यासह अनेक मीडिया कार्यालये उद्ध्वस्त झाली आहेत. गाझामध्ये आतापर्यंत १३६ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३४ मुले आणि २१ महिलांचा समावेश आहे. ९५० नागरिक जखमी झाले आहेत. तर हवाई हल्ल्यात १२ जण ठार झाले आहेत. त्यातील बहुतेक मुले आहेत.
इस्त्रायली लष्कराचे म्हणणे आहे की, हमासने आतापर्यंत गाझा येथून २३०० रॉकेट्स चालविली असून, लोह घुमट क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेने १ हजार रॉकेट नष्ट केल्या आहेत. तर ३८० रॉकेट्स गाझा पट्टीमध्येच पडले आहेत.
इस्रायलमध्ये गृह युद्ध देखील एक शक्यता बनली आहे. अनेक शहरांमध्ये अरबी वंशाच्या नागरिकांशी पोलिस आणि निमलष्करी दलांचा थेट संघर्ष सुरू आहे. युद्धाच्या समाप्तीसाठी सौदी अरेबिया आणि अमेरिकेने राजनैतिक प्रयत्नांना वेग दिला आहे.
इस्रायलच्या अरब आणि ज्यूंच्या मिश्र-लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये हिंसा सुरु झाली आहे. त्यामुळे गृहयुद्ध होण्याची शक्यता येथे निर्माण होत आहे. आज सांयकाळी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आणि इस्लामिक देशांची बैठक होत आहे. इस्त्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नावर सौदी अरेबियाने ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन (ओआयसी) परराष्ट्र मंत्र्यांची ही आभासी बैठक बोलविली आहे. मुस्लिम देशांच्या सर्वात मोठ्या या संघटनेत ५७ देश आहेत.