बंगळुरू – आपल्या छंदालाच आपला व्यवसाय बनवून त्यात दररोज वेगवेगळे प्रयोग करण्याची मजाच काही और असते. आज अनेकजण अशाच पद्धतीने आपला छंद आणि उपजीविका याची सांगड घालत यशस्वीरित्या व्यवसाय करताना दिसतात. यातीलच एक आहेत, बंगळुरू येथील स्वाती द्विवेदी. निसर्गात रमण्याची आणि बागकामाची आवड असणाऱ्या स्वाती यांनी येथील आपल्या स्वत:च्या घराचे रुपडेच पालटून टाकले आहे. शिवाय, घराभोवतीच्या अंगणात त्यांनी तब्बल २०० हून अधिक फळभाज्या, फळे आणि फुले यांची लागवड केली आहे. एवढेच नाही, तर त्यांचा एक यूट्यूब चॅनलही आहे.
एमबीए असलेल्या स्वाती यांनी बीपीओमधील गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या सोडत आपल्या छंदाची कास धरत त्याचेच व्यवसायात रुपांतर कसे केले, ही कहाणी प्रेरणादायी आहे. मूळच्या लखनऊ येथील असलेल्या स्वाती लग्नानंतर म्हणजे ११ वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये आल्या. सुरुवातीला ऍक्सेंचर, आयबीएम अशा कंपन्यांमध्ये त्या काम करत होत्या. पण, नंतर मुलगा झाल्यानंतर त्याच्याकडे लक्ष द्यायचे म्हणून त्यांनी नोकरी सोडली, आणि पूर्णवेळ गृहिणी झाल्या. पण मूळची बागकामाची आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.
बंगळुरूमध्येच स्वत:च्या घरात शिफ्ट झाल्यानंतर, त्या रो हाऊसेस सारख्या सोसायटीमध्ये घराच्या मागे – पुढे चिक्कार जागा होती. त्या जागेतच आपली आवड जोपासण्याचे त्यांनी ठरवले. लहानपणापासून आपल्या मित्र मैत्रिणींमध्ये माळी काका नावाने ओळखल्या जाणाऱ्या स्वाती यांच्यासाठी ही जागा म्हणजे मोठीच संधी होती. घराच्या मागच्या अंगणात त्यांनी भाज्यांची लागवड करण्याचे ठरवले तर पुढच्या अंगणात फुलझाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या बागकामाच्या आवडीचा फायदा असा झाला की, भाज्यांचे भरघोस उत्पादन येऊ लागले, आणि मग त्या शेजारपाजारच्यांना वाटू लागल्या.
बघा त्यांच्या घराच्या गार्डनचा हा व्हिडिओ
२०० हून अधिक झाडे
स्वाती सांगतात, फुले, फळे, भाज्या, शोभेची झाडे असे सगळे मिळून माझ्याकडे २०० हून अधिक झाडे असतील. यात तुळस, पाती चहा, कढीपत्ता, पानवेल, ऍलोव्हेरा, यांसह चिकू, आवळा, पपई, ऊस, स्ट्रॉबेरी अशी फळे, तर दूधी, फरसबी, दोडके, वांगी, टोमॅटो, काकडी, मका अशा भाज्याही आहेत. याशिवाय तुम्हाला माझ्या घरात कधीही २५ ते ३० हाऊसप्लांट दिसतील.
यूट्यूब चॅनल
या क्षेत्रातली त्यांची आवड आणि अनुभव पाहता, हळुहळू आसपासचे लोक त्यांना टिप्स विचारू लागले. यातूनच मग कोणीतरी त्यांना यूट्यूबवर चॅनल सुरू करण्याची कल्पना सुचवली. त्याचा कसलाही अनुभव नसल्याने सुरुवातीला स्वाती जरा भांबावल्या. पण लवकरच त्यांच्या ‘बॅकयार्ड गार्डनिंग’ या चॅनलला चांगलाच प्रतिसाद मिळतो आहे. यूट्यूब चॅनलसाठी जे शिकावे लागते, ते सगळे शिकून घेऊन त्यांनी आता इंग्रजीपाठोपाठ हिंदीतही हा चॅनल सुरू केला आहे. फळे, भाज्या यांची लागवड, त्यांची देखभाल, त्याच्या सहाय्याने घरसजावट, गार्डन टिप्स अशा सर्व गोष्टी या चॅनलवर आपल्याला सापडतात.
टेरेस फार्मिंग
आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअरची वाट सापडल्याने स्वाती खूष आहेत. त्या म्हणतात, व्यवसाय सुरू केला की त्यात लगेच यश मिळावे, अशी साधारणपणे साऱ्यांचीच अपेक्षा असते. पण, आपण वाट का बघू शकत नाही? नोकरी करत असताना, प्रमोशनसाठी थांबण्याची आपली तयारी असते, तसेच येथेही आहे. कोणत्याही व्यवसायाला काही वेळ दिला की त्यात यश हे मिळतेच, हा माझा अनुभव आहे. त्यामुळेच वाट पहा, असा सल्लाही त्या नवोदितांना देतात. आज आपल्यापासून प्रेरणा घेऊन अनेकांनी आपल्या घरातच टेरेस फार्मिंग सुरू केल्याचे त्या आनंदाने सांगतात.