मुंबई – टोकीयो ऑलिम्पिक स्पर्धेनंतर आता काही प्रशिक्षक आणि खेळाडूमध्ये वाद निर्माण होऊ लागले आहेत. राष्ट्रीय प्रशिक्षक सौम्यदीप रॉय यांनी ऑलिम्पिक पात्रता दरम्यान मार्चमध्ये एक सामना गमावण्यास सांगितले होते, त्यामुळे ऑलिम्पिकमधील टेनिसच्या एकेरी स्पर्धेत रॉयची मदत मी घेण्यास नकार दिला होता, असा आरोप टेबल टेनिस खेळाडू मोनिका बत्रा हिने केला आहे.
टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने मोनिका बत्रा हिला कारणे दाखवा नोटीस दिली आहे. त्याला उत्तर देताना बत्रा हिने रॉयची मदत घेण्यास नकार देऊन तिने खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवल्याच्या आरोपाला स्पष्टपणे नाकारले आहे. तसेच टीटीएफआयचे सचिव अरुण बॅनर्जी यांना दिलेल्या उत्तरात मनिका म्हणाली की, शेवटच्या क्षणी रॉयच्या हस्तक्षेपामुळे होणारा व्यत्यय टाळण्याशिवाय राष्ट्रीय प्रशिक्षकाशिवाय खेळण्याचा माझ्या निर्णयामागे एक गंभीर कारण होते.
राष्ट्रीय प्रशिक्षकाने मार्च 2021 मध्ये दोहा येथे पात्रता स्पर्धेत सामना गमावण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला.
माझ्याकडे या घटनेचे पुरावे असून ते मी योग्य वेळी सादर करेन. राष्ट्रीय प्रशिक्षक मला सामना गमावण्यास सांगण्यासाठी माझ्या हॉटेलच्या खोलीत आले आणि सुमारे २० मिनिटे बोलले. तसेच मी त्यांना याबाबत कोणतेही वचन दिले नाही आणि लगेच टीटीएफआयला कळवले. मात्र, त्याच्या दबावामुळे आणि धमक्यामुळे माझ्या खेळावर परिणाम झाला.
या आरोपाविषयी प्रतिक्रीयेबाबत रॉय यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मात्र पूर्वी खेळाडू असलेले रॉय आता प्रशिक्षक बनलेले असून त्यांना सध्याच्या राष्ट्रीय शिबिरापासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच टीटीएफआयने रॉय यांना आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. रॉय हे राष्ट्रकुल क्रीडा संघाचे सुवर्णपदक विजेते असून त्यांना अर्जुन पुरस्कारही मिळाला आहे.