इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – एखादी व्यक्ती खूप कर्तृत्ववान असते, यशस्वी असते, मात्र ती व्यक्ती वैयक्तिक जीवनात व्यवस्थित वागेलच असे नाही. जवळच्या व्यक्तींमध्ये त्याची प्रतिमा वेगळी असू शकते. असेच काहीसे नोवाक जोकोविच याच्यासोबत घडले आहे. जोकोविच माहीत नाही, असा क्वचितच कोणी असेल. त्यालाही नुकताच आपल्या रागापोटी मजबूत भुर्दंड बसला आहे.
विम्बल्डन टेनिस स्पर्धा नुकतीच पार पडली. यात जोकोविच उपविजेता ठरला. नोवाक जोकोविच विक्रमवीर टेनिसपटू असला तरी रागावर त्याचे नियंत्रण नाही, हे सत्य आहे. अनेकदा रॅकेट आपटून तो आपला राग कोर्टवर व्यक्त करताना प्रेक्षकांनी पाहिले आहे. रविवारी झालेल्या विम्बल्डन अंतिम सामन्यात असाच त्याचा राग त्याला महागात पडला. त्यासाठी त्याला ६,११७ युरोंचा दंड करण्यात आला. म्हणजे आपले तब्बल ६ लाख ५७ हजार रुपये.
अंतिम सामन्यातील प्रकार
विम्बल्डन सेंटर कोर्टवर झालेला जोकोविच आणि अल्काराझ यांच्यातील अंतिम सामना चुरशीचा झाला. यात अल्काराझने १-६, ७-६, ६-१, ३-६, ६-४ असा पाच सेटमध्ये विजय मिळवला. सामना संपल्यानंतर त्याने अल्काराझची प्रशंसा केली. परंतु एका क्षणी व्यक्त केलेला राग त्याला भलताच महागात पडला. अंतिम सेटमध्ये हा प्रकार घडला. या सेटमध्ये जो सर्व्हिस भेदणार होता त्याला आघाडी घेता येणार होती. परंतु संधी असताना जोकोविच अल्काराझची सर्व्हिस भेदू शकला नाही आणि लगेचच स्वतःची सर्व्हिस राखू देखील शकला नाही. याचा त्याला स्वतःलाच राग आला. आणि हा राग त्याने नेहमीप्रमाणे रॅकेटवर काढला. त्याने स्वतःची रॅकेट नेट पोलवर जोरात मारली, त्यामुळे पोलला पोक आलेच पण रॅकेटही तुटली. यानंतर चेअर अंपायर फर्ग्युस मर्फी यांनी जोकोविचलला नियम मोडल्याचे सांगत ६,११७ युरोचा दंड ठोठावला. विशेष म्हणते, ही रक्कम जोकोविचला उपविजेतेपदासाठी मिळालेल्या १.१७५ दशलक्ष पौंड (सुमारे ११ लाख रुपायांपेक्षा अधिक) रकमेतून कापून घेण्यात आली.
दोनवेळा ताकीद
या अंतिम सामन्यात जोकोविचला दोनवेळा टोकण्यात आले. यातील पहिली ताकीद त्याने वेळेत सर्व्हिस केली नव्हती आणि दुसरी ताकीद रॅकेट आपटल्याबद्दल होती. ब्रेक पॉइंट मी जिंकू शकलो नाही याचा राग मला आला आणि त्यातून हे घडल्याचे जोकोविचने सांगितले. याआधी रागामुळे त्याला २०२० च्या यूएस ओपन स्पर्धेतून बाद करण्यात आले होते.
विक्रम हुकला
नोवाक जोकोविचसाठी हा अंतिम सामना जिंकणे अत्यंत महत्त्वाचे होते. जोकोविच जिंकला असता तर त्याला रॉजर फेडररच्या आठ विम्बल्डन विजेतेपदाशी बरोबरी साधता आली असती. तसेच सर्वाधिक २४ ग्रँड स्लॅम विजेतेपदाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या विक्रमाशी बरोबरी साधता आली असती.