नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आज (6 फेब्रुवारी 2025) आपल्या कुटुंबियांसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. यावेळी राष्ट्रपती आणि सचिन यांनी अमृत उद्यानातही फेरफटका मारला.
यानंतर राष्ट्रपती भवनाचा उपक्रम असलेल्या ‘राष्ट्रपती भवन विमर्श शृंखला’ अंतर्गत झालेल्या चर्चेत सचिन यांनी क्रिकेटपटू म्हणून आपल्या प्रवासातील काही प्रेरणादायक किस्से सांगितले. या चर्चासत्राला उदयोन्मुख खेळाडू आणि विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी उपस्थित होते.
या चर्चासत्रात सचिन यांनी एकभावनेने काम करण्याचे महत्त्व, इतरांची काळजी घेणे, दुसऱ्यांचे यश साजरे करणे, मेहनत, मानसिक व शारीरिक बळ विकसित करणे आणि यासारखे अनेक आयुष्य घडविणारे पैलू उलगडून दाखविले. भविष्यातले किर्तीमान खेळाडू देशातल्या दूरदूरच्या भागातून, आदिवासी समाजातून आणि फारसा विकास न झालेल्या भागातून आलेले असतील असा विश्वास सचिन यांनी व्यक्त केला.