अश्विनी कावळे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
टेलिग्राम या अॅपची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्सअॅपपेक्षा वेगळे काही फिचर्स फक्त टेलिग्राममध्येच असल्याने युझर्सचा कल या अॅपकडे वाढतो आहे. शिवाय प्रायव्हसीच्या दृष्टीनेदेखील हे अॅप लोकांच्या पसंतीस उतरले आहे. हाच धागा पकडत आता टेलिग्राम आपल्याकडून अॅप वापरण्यासाठी पैसे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण टेलिग्राम कंपनीलाही आर्थिक स्थैर्यासाठी आता पैशांची गरज भासत आहे.
व्हॉट्सअॅपबरोबरच टेलिग्राम हे इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. या अॅपमध्ये वेगवेगळे ग्रुप्स स्वतःहून जॉईन करण्याबरोबरच अनेक वेगवेगळे फिचर्स आहेत. हे सगळे फिचर्स मोफत उपलब्ध असल्याने लोकांचीही या अॅपला पसंती आहे. परंतु, रिपोर्टनुसार ही मोफत सुविधा टेलिग्राम लवकरच बंद करणार आहे. गेले अनेक वर्ष मोफत वापरता येणारे हे अॅप आता पैसे देऊन वापरावे लागणार आहे. यासाठी टेलिग्राम लवकरच प्रीमियम सर्व्हिस लाँच करणार असून त्यासाठी पैसे आकारले जातील.
विशेष म्हणजे गेले अनेक वर्ष टेलिग्राम जाहिराती नाही, सबस्क्रिप्शन नाही या तत्वावर काम करत असल्याचा दावा करत होते. त्यामुळे युझर्सला हे अॅप अधिक आवडत होतो. पण आता पैसे आकारले जाणार असल्याने कंपनीचे ते तत्वही नाहीसे होणार असल्याचे दिसून येत आहे.
सध्या अॅपच्या बीटा व्हर्जनमधून याविषयी माहिती समोर आली आहे. पण हे नवीन व्हर्जन कधी येणार, यासाठी किती पैसे आणि कधीपासून भरावे लागणार याची माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र बीटा व्हर्जनमध्ये आतापेक्षा जास्त फीचर्सदेखील युझर्सला दिले जाणार आहेत. कंपनी आपल्या अॅपची डिझाईनदेखील बदलण्याच्या तयारीत असून व्हॉट्सअॅपच्या धर्तीवर हे बदल होऊ शकतात. आता हे प्रीमियम व्हर्जन कसे असणार हे येत्या काळात अॅपमध्ये नवीन सुधारणा आल्यानंतर कळू शकणार आहे.