नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाइल नेटवर्कच्या क्षेत्रात कधीकाळी वर्चस्व गाजविणाऱ्या व्होडाफोन आणि आयडिया दोन्ही कंपन्या काही वर्षांपूर्वी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दोघांनी मिळून व्हीआय अंतर्गत सेवा सुरू केली. पण, या दोन्ही कंपन्यांच्या आर्थिक समस्या सुटायला तयार नसल्याचे चित्र आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबून ही कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज कंपनी कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीजने एक अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार, महागाई दर हा रिझर्व्ह बँकेच्या अंदाजापेक्षा अधिक असल्यानं दूरसंचार कंपन्या पुढील वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, शक्यतो जून २०२४ मध्ये टॅरिफ दर वाढवण्यास सुरुवात करतील. टॅरिफ दर वाढीशिवाय, व्होडाफोन आयडिया आवश्यक गुंतवणूक करू शकणार नाही आणि फाइव्ह जी सेवा सुरू करू शकणार नाहीत. त्यामुळे कंपनीच्या ग्राहकांची संख्या आणखी कमी होईल आणि भांडवल उभारणीची योजना प्रत्यक्षात आणणं कठीणही होईल.
रिपोर्टनुसार, यामुळे बाजारात रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल या दोनच खासगी क्षेत्रातील कंपन्या उरतील. या कारणास्तव, दीर्घकालीन स्थितीत दोन कंपन्यांच्या मक्तेदारी स्थितीबद्दल चिंता आहे. ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, टेलिकॉम कंपन्या सार्वत्रिक निवडणुकांनंतरच जून २०२४ मध्ये टॅरिफ वाढवण्याची शक्यता आहे. याचे कारण रिझर्व्ह बँकेच्या अंदाज मर्यादेपेक्षा अधिक असलेला महागाई दर आणि राज्यांमधील निवडणुका असणार आहे.
गुंतवणूक वाढविणे आवश्यक
टॅरिफ दर वाढवण्यास विलंब झाल्यामुळे व्होडाफोन आयडियावर विपरित परिणाम होईल आणि बाजारात टिकून राहणे कठीण होईल. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमध्ये मक्तेदारीची परिस्थिती निर्माण होईल. याशिवाय व्होडाफोन आयडियाला फोर जी कव्हरेज वाढवण्यासाठी आणि फाइव्ह जी सेवा सुरू करण्यासाठी गुंतवणूक वाढविणे आवश्यक असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
ग्राहकांनी चिंता करू नये
गुंतवणूक वाढवणे आवश्यक ग्राहकांनी काळजी करू नये. कंपनीने काम करणे बंद केल्यास, ग्राहकांना इतर दूरसंचार कंपन्यांमध्ये पोर्ट करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जाईल. नियमानुसार, टेलिकॉम कंपन्यांना भारतातील त्यांचे कामकाज बंद करण्यापूर्वी ग्राहकांना किमान ३० दिवसांची आगाऊ सूचना द्यावी लागते. या संदर्भात दूरसंचार नियामकला ६० दिवस अगोदर नोटीस द्यावी लागेल. जर एखाद्या ग्राहकाला त्याचा नंबर कायम ठेवायचा असेल तर त्याला दुसऱ्या कंपनीकडे जाण्याचा पर्याय आहे किंवा तो नवीन मोबाईल कनेक्शन देखील घेऊ शकतो.
Telecom Vodafone Idea Service Debt Operation