नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) ग्राहकांना मिळत असलेल्या सेवांची गुणवत्ता आणि अनाहूत व्यावसायिक संपर्कामुळे होणारा त्रास याबाबतच्या मुद्यांचा आढावा घेण्याच्या उद्देशाने काल येथे प्रमुख दूरसंचार सेवा पुरवठादारांसोबत बैठक आयोजित केली. आपल्या सेवांच्या गुणवत्तेमध्ये आणि ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवाच्या गुणवत्तेमध्ये निदर्शनास येईल अशा प्रकारची सुधारणा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याचे निर्देश प्राधिकरणाने या दूरसंचार सेवा पुरवठादारांना दिले. कॉल म्युटिंग आणि एकाच बाजूने बोलणे सुरू राहणे आणि दुसऱ्या बाजूने प्रतिसाद न मिळण्याच्या समस्यांमागील कारणांचे मूल्यमापन करण्याची आणि त्यावर प्राधान्याने उपाययोजना करण्याची सूचना या पुरवठादारांना करण्यात आली. 5G जाळ्याचा विस्तार वाढवत जाताना सध्या अस्तित्वात असलेल्या दूरसंचार सेवांमध्ये व्यत्यय कमीत कमी राहील किंवा त्यांच्या गुणवत्तेमध्ये घसरण होणार नाही हे सुनिश्चित करण्याची गरज प्राधिकरणाने व्यक्त केली.
बऱाच काळ नेटवर्क खंडित राहण्याच्या घटनांवर ट्रायकडून अतिशय बारीक नजर ठेवली जात आहे अशी माहिती देखील सेवा पुरवठादारांना देण्यात आली. अशा प्रकारच्या खंडित कालावधीचा, दूरसंचार सेवांच्या गुणवत्तेवर आणि ग्राहकांना मिळणाऱ्या अनुभवावर विपरित परिणाम होतो. कोणत्याही राज्यात किंवा जिल्ह्यात अशा प्रकारचा व्यत्यय निर्माण झाल्यास त्याची माहिती ट्रायला कळवण्याचे निर्देश या दूरसंचार सेवा पुरवठादारांना देण्यात आले. गरज भासल्यास या संदर्भात ट्रायकडून आवश्यक नियमन आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे ट्रायने सांगितले.
परवाना सेवा क्षेत्र, राज्य स्तर किंवा लोअर ग्रॅन्युलॅरिटीसह कामगिरीविषयक अहवाल तयार करण्यासाठी सेवा गुणवत्ताविषयक मानके आणि त्यांच्यावरील प्रक्रियांसाठी ऑनलाईन डेटा संकलनाकरता आवश्यक प्रणालींचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे निर्देशही ट्रायकडून देण्यात आले. यामुळे सेवांच्या गुणवत्तांची माहिती देण्याची प्रक्रिया सुलभ होईल आणि अनुपालनाचे ओझे कमी होईल.
5G सेवां सुरू करण्यासाठी उभारल्या जात असलेल्या जाळ्याचे प्रमाण आणि आकारमान आणि विविध उद्योगांकडून विकसित होत असलेल्या महत्त्वाच्या वापराची प्रकरणे विचारात घेत ट्रायने अंतर्गत सेवा गुणवत्तेवर देखरेख ठेवण्यासाठी 24×7 आणि 360 अंशावर आधारित प्रणालींची अंमलबजावणी करण्याची सूचना ट्रायने सेवा पुरवठादारांना केली. आदर्श मानकानुसार नेटवर्क फीचर्सचा वापर आणि सेवा गुणवत्तांवर देखरेख ठेवण्यासाठी आणि व्यवस्थापनासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स/ मशीन लँग्वेज तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची सूचना देखील करण्यात आली.
ट्रायने 16-2-2023 रोजी जारी केलेल्या दोन निर्देशांची कालबद्ध पद्धतीने अंमलबजावणी करावी असे ट्रायने सांगितले. काही टेलिमार्केटिअर संस्थांकडून प्रमुख नामवंत कंपन्यांच्या हेडर्सचा आणि मेसेज टेम्प्लेटचा गैरवापर रोखण्यासाठी आणि अवैध आणि बिगरनोंदणीकृत टेलिमार्केट कंपन्यांकडून दूरध्वनी क्रमांकांचा वापर करून पाठवल्या जाणाऱ्या मेसेजना प्रतिबंध करण्यासाठी हे निर्देश जारी करण्यात आले आहेत. तसेच नोंदणीकृत टेलिमार्केट कंपन्यांकडून किंवा 10 आकडी क्रमांकांवरून येणारे नको असलेले कॉल रोखण्यासाठी आणि व्यवस्थापन आणि देखरेखीसाठी त्यांना डीएलटी मंचावर आणण्यासाठी देखील हे निर्देश आहेत.
Telecom Trai Mobile Tower Consumer Service