मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुकेश अंबानी यांनी अलीकडेच आपल्या कंपनीत भाकरी फिरवून सगळी जबाबदारी मुलांकडे अर्थात नवीन पिढीकडे सोपवली. निता अंबानी आता केवळ मार्गदर्शकाच्या भूमिकेत असणार आहेत. मात्र त्याचवेळी अंबानी यांनी जिओ फायबर 5G फायबरच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात शिरण्याचा निर्धार केला आहे.
सुरुवातीला खूप छान ऑफर्स द्यायच्या, त्यानंतर लोकांना सवय झाली की हळूहळू दर वाढवायचे, ही जिओची अर्थातच अंबानींची स्ट्रॅटेजी राहिलेली आहे. मात्र उत्तम सेवा देत असल्यामुळे लोकांनीही जिओवर विश्वास दाखवला आहे. अलीकडेच भारती एअरटेलने 5G तंत्रज्ञानावर आधारित फायबर आणि ब्रॉडबँडची सुविधा सुरू केली. त्याला उत्तम प्रतिसादही मिळत आहे. पण अंबानी यावर नक्कीच मात करतील असे वाटत होते. आणि तसेच झाले. त्यांनी आता 5G नेटवर्क आणि सर्वोत्तम वायरलेस तंत्रज्ञान वापरून जिओ एअर फायबर देशातील प्रत्येक घरात आणि कार्यालयात पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांनी तीन वर्षांत २०० दशलक्ष ग्राहक जोडण्यात येतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
‘१० दशलक्षांहून अधिक परिसर जिओ फायबरशी जोडलेले आहेत. तरीही लाखो कॅम्पस असे आहेत, जेथे वायर कनेक्टिव्हिटी देणे कठीण आहे. जिओ एअर फायबर ही अडचण कमी करणार आहे. याद्वारे आम्ही २० कोटी घरे आणि परिसरांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा करीत आहोत. जिओ एअर फायबर लाँच केल्यामुळे जिओला दररोज १.५ लाख नवीन ग्राहक जोडता येणार आहेत,’ असे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले. सध्या जिओ फायबर १० दशलक्ष घरांपर्यंत पोहोचले आहे आणि त्याची ऑप्टिकल फायबर केबल १.५ दशलक्ष किलोमीटरपेक्षा जास्त आहे. जिओ एअर फायबरसह त्यात दररोज १५०,००० घरे जोडण्याची क्षमता आहे. कंपनीने होम ब्रॉडबँडसाठीचे आपले लक्ष वाढवले असून, १०० दशलक्ष घरांवरून थेट २०० दशलक्ष घरांपर्यंत नेले आहे, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
कोण किती वापरतय?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जून २०२३ पर्यंत देशात ३५ दशलक्ष वायर्ड ब्रॉडबँड ग्राहक होते. परंतु फिक्स्ड वायरलेस ब्रॉडबँड बाजार लहान असून, त्याद्वारे जून अखेरीस सुमारे ९ लाख ५० हजार ग्राहक जोडले गेल्याची माहिती ट्रायने दिली आहे. सध्याच्या वायर्ड ब्रॉडबँड कंपन्या म्हणजे वायर नेटवर्क पुरवणाऱ्या कंपन्या रिलायन्स जिओ (९.१७ दशलक्ष), भारती एअरटेल (६.५४ दशलक्ष), बीएसएनएल (३.६६ दशलक्ष), एट्रिया कन्व्हर्जन्स (२.१६ दशलक्ष) आणि हॅथवे (१.१२ दशलक्ष) आहेत.
Live in every house in the country!
Telecom Internet Wifi Reliance Jio Fibre Mega plan Market