नवी दिल्ली – देशातील टेलिकॉम कंपन्यांनी स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅनसह एसएमएस सुविधाही बंद केली आहे. या निर्णयाचा कंपन्यांना फायदा होणार आहे. स्वस्त रिचार्ज (१०० रुपयांच्या आत) करणार्या ग्राहकांना हा मोठा धक्का आहे. एमएनपी (मोबाईल नंबर पोर्टिबिलिटी) पासून यूपीआयसारख्या सेवांसाठी एसएमएसची गरज असते. त्यासाठी या ग्राहकांना अतिरिक्त पैसे अदा करावे लागणार आहेत.
रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्हीआय या कंपन्यांपैकी कोणत्याही कंपनीच्या प्लॅनमध्ये शंभर रुपयांपेक्षा कमी किमतीचे कॉलिंग आणि डाटा प्लॅनमध्ये एसएमएसची सुविधा दिलेली नाही. आधी सर्व कंपन्या मोफत एसएमएसची सुविधा देत होत्या. परंतु आता एंट्री लेवल प्लॅन अपडेट केल्यानंतर या सुविधेला हटविण्यात आले आहे.
एकानंतर एक कंपन्यांकडून प्लॅन मागे
Gadgets360 च्या माहितीनुसार, २०१७ मध्ये रिलायन्स जिओने ९८ रुपयांचा प्लॅन सादर केला होता. त्यामध्ये एसएमएसची सुविधा मिळत होती. कंपनीने एसएमएसचा कोटा १०० मेसेजवरून वाढवून ३०० मेसेजपर्यंत केला होता. त्यानंतर या प्लॅनला हटविण्यात आले होते. जिओने मे २०२१ मध्ये हा प्लॅन पुन्हा सादर केला. परंतु यामध्ये एसएमएस हटविण्यात आले होते. त्यानंतर एअरटेल आणि पुन्हा काही दिवसांनंतर व्हीआय (व्होडाफोन आयडिया) सुद्धा या ट्रेंडमध्ये सहभागी झाल्या.
कंपन्या कमावणार पैसे
Gadgets360 च्या वृत्तानुसार, टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या सरासरी आर्थिक उत्पन्नावर प्रतिग्राहकाकडून होणार्या सरासरी मिळकतीला वाढविण्यासाठी आपल्या स्वस्त प्लॅनसह एसएमएस सुविधा न देण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांना मेसेज पाठविण्याची गरज आहे, त्यांना अतिरिक्त एसएमएस पॅक निवडावा लागेल अथवा महाग प्लॅन स्वीकारावा लागेल, असे जाणकार सांगतात.
ग्राहकांना फटका
आर्थिक वर्ष २०२२ च्या पहिल्या तिमाहीत रिलायन्स जिओचा सरासरी महसूल प्रतिग्राहक १३८.४ रुपये आहे. एअरटेल आणि व्हीआयच्या २०२१ च्या चौथ्या तिमाहीच्या निकालात प्रत्येकी १४५ रुपये आणि १०२ रुपये प्रतिग्राहक महसूल होता. टेलिकॉम कंपन्यांच्या या पावलामुळे एंट्री लेवल प्लॅनचा रिचार्ज करणार्या ग्राहकांना फटका बसण्याची शक्यता आहे.