मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मोबाईल रिचार्ज महागणार म्हटल्यावर ग्राहकांच्या अंगावर काटाच येतो. कारण सुरुवातीला १०-२० रुपयांत होणाऱ्या कामासाठी आता तब्बल १०० रुपये मोजावे लागतात. त्यातही पूर्ण तीस दिवस वापरायला मिळत नाही. त्यामुळे एक महिना संपायच्या आतच दुसऱ्या रिचार्जची वेळ येते. अश्यात आता भारतीय एअरटेलने मोबाईल रिचार्जचे दर वाढविण्याची घोषणा केल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
जवळपास सर्वच मोबाईल कंपन्यांनी कॉलिंग मोफत केले आहे. जो काही पैसा घेतला जातो तो डेटासाठी घेतला जातो. कारण हल्ली कॉलिंग ही लोकांची प्रायोरिटी राहिलेली नाही. डेटा आणि इंटरनेट या दोनच गोष्टी सध्या महत्त्वाच्या मानल्या जातात. अश्यात रिचार्ज महागणार म्हणजे डेटा महागणार. आणि डेटा संपला की कुणीही शांत बसू शकत नाही. त्यामुळे टॉप-अपचा मार्ग निवडतात. यातून दुसरं काहीच नाही कंपन्यांचाच फायदा होणार हे निश्चित असतं. भारतीय एअरटेलने ५७ टक्क्यांनी रिचार्जचे दर वाढविण्याची घोषणा केली आहे. म्हणजे आता ९९ रुपयांत मिळणारे रिचार्ज १५५ रुपयांत खरेदी करावे लागणार आहे. २८ दिवसांची वैधता आणि त्यात १ जिबी रोजचा डेटा, असा हा प्लान असेल. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर यांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. देश डिजीटलायझेशनच्या दिशेने प्रवास करत असताना डेटा आणि उपकरणांच्या किंमती वाढणे चिंताजनक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
सात सर्कलमध्ये वाढणार दर
हरियाणा आणि ओडिसासह आता देशभरातील सात सर्कलमध्ये रिचार्जचे दर वाढणार आहेत, अशी घोषणा भारतीय एअरटेलने केली आहे. त्यामुळे कंपनीचा सरासरी महसूल वाढणार आहे. लवकर संपूर्ण देशात नवे दर लागू होतील. विशेष म्हणजे भारती एअरटेलनंतर जवळपास सर्वच कंपन्या आपले दर वाढवतील, असा अंदाज व्यक्त होत आहे.
Telecom Airtel Mobile Recharge Rate Hike