इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भाजीत मीठ जास्त वा कमी पडले म्हणून तसेच चालताना साधा धक्का लागला म्हणून हत्या करण्याचे प्रकार घडताहेत. यात आता मुलाने जन्मदात्याचा आईची हत्या करण्याचा प्रकार समोर आला असून या कृत्यामागील कारण अधिक संतापजनक आहे. लग्न लावून दिले नाही वा लग्नासाठी मुलगी शोधली नाही, या कारणामुळे ही हत्या झाल्याची माहिती पुढे आली आहे. तेलंगणातील या प्रकारावर प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
प्राप्त माहितीनुसार, बांदा मेलाराम येथे व्यंकटम्मा नावाची ४५ वर्षीय महिला आणि तिचा अवघा २१ वर्षाचा मुलगा ईश्वर राहत होते. मागच्या काही दिवसांपासून ईश्वरसाठी त्याची आई लग्नासाठी मुलगी शोधत होती. पण लग्नासाठी मुलगी न मिळाल्याने ईश्वरने आधी विटांनी मारून आईची हत्या केली आणि त्यानंतर पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी त्याने आईचा गळा आणि पाय कापले.
पोलिसांनी सांगितले की, दिव्यांग असलेला ईश्वर आपल्याला लग्नासाठी मुलगी शोधावी यासाठी आईवर दबाव टाकत होता. तो दिव्यांग आणि बेरोजगार असल्यामुळे त्याला मुली मिळण्यासाठी अडचणी येत होत्या त्यामुळे त्याने आपल्या एका मित्राला हाताशी धरून जन्मदात्या आईची हत्या केली. यानंतर महिलेच्या मुलीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली आणि मुलासह त्याच्या एका मित्राला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्याची कबूली करून घेतली आहे.
पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
आरोपीने त्याच्या आईची वीट मारून-मारून हत्या केली व नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिचा गळा चिरला आणि पायही कापले. मृत महिलेच्या मुलाने या सर्व घटनेला चोरीच्या उद्देशाने झालेली हत्या असे भासवण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. ईश्वरने त्याच्या आईची अत्यंत निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Telangana Crime Family Son Mother Police