नांदेड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भारत राष्ट्र समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव अर्थात केसीआर यांनी महाराष्ट्रात पक्षविस्ताराचा निर्णय घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी पाऊले उचलली आहेत. महाराष्ट्रात प्रवेश करताच त्यांनी येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलविले आहे. राज्यात कवडीमोल किंमतीने विक्री होत असलेल्या कांद्याला केसीआर यांनी तेलंगणमध्ये प्रति क्विंटल १८०० रुपये भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा प्रदान केला आहे.
तेलंगणापाठोपाठ भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्रात पक्षविस्तार सुरू केला आहे. गुरुवारी पक्षाचे राज्यातील पहिल्या कार्यालयाचे उद्घाटन नागपूर येथे झाले. त्याप्रसंगी त्यांनी नागपूरात कार्यकर्ता मेळावा आणि सभा घेतली. कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी राबविलेल्या तेलंगण पॅटर्नची अंमलबजावणी संपूर्ण देशभरात करण्याची घोषणा केली. एकीकडे नागपूर येथे कार्यकर्ता मेळावा सुरू असतानाच दुसरीकडे केसीआर यांनी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मदतीचा हात दिला.
मराठवाड्यातील काही शेतकऱ्यांनी बीआरएसच्या मदतीने तेलंगणचे मार्केट गाठून आपला कांदा विकला आहे. सध्या महाराष्ट्रातल्या क्विंटलभर कांद्याला १००-२०० रुपये भाव मिळत असताना, हाच कांदा तेलंगाणामध्ये सरासरी १८०० रुपये दराने खरेदी करण्यात आला आहे. भाव पडल्यामुळे आपल्याकडे डोळ्यात पाणी आणणाऱ्या त्याचे कांद्याने वाहतूक खर्च, अडत, हमाली वजा जाता सरासरी १२०० रुपये हातात पडल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे.
२० ते २५ ट्रक तेलंगणला रवाना
केसीआर यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी बीआरएसच्या स्थानिक नेत्यांना सूचना केली होती. त्यानुसार मागच्या आठवड्यात कन्नडमधून ६ ट्रक तेलंगणकडे रवाना झाले होते. आता आणखी २०-२५ ट्रक माल जात असल्याची माहिती आहे.