इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारती जनता पक्षाने स्वत:च्या संघटन आणि कार्यशैलीत प्रचंड बदल केला आहे. अगदी कॉर्पोरेट स्टाइलने त्यांचे काम सुरू आहे. अशातच आता पक्षाने आमदारांना संपर्क अभियानावरून रँकिंग देण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आमदारांना चांगले रँकिंग मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांशी अधिकाधिक संवाद साधणे, सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन जेवणे तसेच अधिकाधिक संपर्क करण्यावर भर दिला आहे.
भाजपचे देशभरातील ११९ आमदार सध्या तेलंगणामध्ये तळ ठोकून आहेत. त्यात महाराष्ट्रातील २१ आमदारांचा समावेश आहे. हे आमदार गावोगावी फिरतात, लोकांना भेटतात, सामान्य कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन जेवतात. दिवसभर त्यांनी काय काय केले यावर रात्री पक्षाच्या मुख्यालयाकडून त्यांना रैंकिंग दिले जाते. तेलंगणामध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. तेथे जबरदस्त यश मिळविण्याच्या इराद्याने उतरलेल्या भाजपने आता महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि आसाममधील आमदारांना प्रत्येकी एक याप्रमाणे ११९ मतदारसंघांमध्ये मैदानात उतरविले आहे. या प्रवासी आमदारांचा दिवस सकाळी ९ पासून सुरू होतो.
पक्षाच्या राष्ट्रीय मुख्यालयाने त्यांना दैनंदिन कार्यक्रमही दिला आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी लागते. शहरी भागामध्ये भाषेची अडचण या आमदारांना फारशी येत नाही; पण ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी तेलुगू भाषा बोलली जाते. तिथे संवादाची अडचण येऊ नये, म्हणून काही आमदारांनी सोबत दुभाषी ठेवला आहे. हे आमदार हिंदीतून बोलतात, मग दुभाषी ते तेलुगूमध्ये समजावून सांगतो.
असा असतो दिनक्रम
भाजपच्या बूध प्रमुखांची बैठक घेणे, काही प्रमुखांच्या घरी भेट देणे, रॅली काढणे, व्यावसायिकांशी संवाद, त्यांच्याकडेही भोजन वा नाश्ता घेणे, समाजातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांची माहिती, असा भरगच्च कार्यक्रम असतो. अनुसूचित जाती वा जमातीच्या कार्यकर्त्यांच्याच घरी जेवण घ्यायचे, असा दंडक आहे. लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न कोणते आहेत, ते कसे सोडविता येऊ शकतात, मुख्यमंत्री के. सी. राव यांच्या विरोधातील मुद्दे कोणते आहेत, कुठले मुद्दे हे निवडणुकीत कळीचे ठरू शकतात. ‘फीडबॅक’ही आमदारांना पक्षाकडे द्यावा लागतो.
Telangana BJP Politics Election Strategy MLA MP Team
Assembly Meetings Get together