इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – येत्या लोकसभा निवडणुकीत तुम्ही ईव्हीएमवरील कुठलेही बटन दाबा, कुणालाही मत द्या. मात्र, जिंकून मीच येणार असल्याचा अजब कॉन्फिडन्स भाजपच्या एका खासदाराने व्यक्त केला आहे. त्यांच्या या आत्मविश्वासपूर्ण वक्तव्याने ईव्हीएममधील घोळाबाबत व्यक्त होणारी शंका खरी तर नाही ना, अशी चर्चा होऊ लागली आहे.
तेलंगणातील भाजपच्या या खासदाराचे नाव धर्मपुरी अरविंद असे आहे. त्यांच्या खळबळजनक वक्तव्याचा एक व्हिडिओ सध्या बराच व्हायरल झाला आहे. अलिकडच्या काही वर्षांमध्ये निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा आरोप वारंवार होत आहे. विरोधकांकडून नेहमी केंद्र सरकार एव्हीएम मशिमध्ये फेरफार करत असल्याचा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर अरविंद यांचे विधान राजकीय वर्तुळात खसखस पिकवून गेले आहे.
“तुम्ही नोटाचं बटण दाबा, मीच जिंकेन. तुम्ही गाडीवर मत द्या, मीच जिंकेन. तुम्ही हातावर मत द्या, मीच जिंकेन. मी तुमच्या फायद्यासाठी इथे आलोय. येणार तर मोदीच”, असे म्हणताना दिसत आहेत. बुधवारी तेलंगणाच्या निजामाबाद मतदारसंघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे विधान केले असून हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नवा वाद निर्माण झाला आहे. हे वक्तव्य गांभीर्याने घेत तपास करण्याची मागणी बीआरएस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे.
चर्चेला उधाण
दरम्यान, ईव्हीएम मशिनमध्ये घोळ होत असल्याचा दावा विरोधकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून केला जात आहे. यावर निवडणूक आयोगाने मात्र असा फेरफार करणे शक्य नसून ईव्हीएम मशीन पुर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगण्यात येते. मात्र आता भाजप खासदाराच्या या वक्तव्याने पुन्हा चर्चांना उधाण आले आहे.
Telangana BJP MP Arvind Dharmapuri Claim EVM Vote Win
Video Viral