इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील तहसीलदारांनी चक्क भगवान शंकरासह १० जणांना हजर राहण्याची नोटिस बजावली आहे. सुनावणीसाठी हजर राहिले नाही, तर १० हजार रुपयांचा दंड आणि ताब्यातून बेदखल केले जाण्याचा इशारा तहसीलदारांनी नोटिशीत दिला आहे. अवैधरित्या जमिनीवर ताबा मिळविल्याचा भगवान शंकरांवर आरोप आहे. भगवान शंकराला नोटीस देण्याची छत्तीसगढमधील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये जांजगीर-चांपा जिल्ह्यातील सिंचन विभागाने भोलेनाथांना नोटीस जारी करून जमिनीचा ताबा सोडण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
रायगढ शहरातील प्रभाग क्रमांक २५ कौहकुंडा येथे एक शिव मंदिर आहे. सरकारी जमिनीवर अवैधरित्या शिव मंदिरासह १६ जणांवर अवैधरित्या ताबा मिळविल्याचा आरोप करत सुधा राजवाडे यांनी बिलासपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. राज्य शासन आणि तहसीलदार कार्यालयाला याबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करत तहसीलदार कार्यालयाने १० जणांना नोटीस बजावली आहे. यामध्ये शिव मंदिराचेही नाव आहे. नोटिशीत मंदिराचे विश्वस्त, व्यवस्थापक किंवा पुजाऱ्यांना संबोधित करण्यात आले नसून, चक्क भगवान शंकर यांनाच नोटीस जारी करण्यात आली आहे.
दहा हजारांचा दंड
भगवान शंकर यांना पाठविण्यात आलेल्या नोटिशीत तहसीलदार इशारा दिला की, छत्तीसगढ जमीन महसूल कायद्याच्या कलमाअंतर्गत तुमचे हे कृत्य गुन्ह्याच्या श्रेणीत येते. तुम्हाला दहा हजार रुपयांच्या दंडासह जमिनीच्या ताब्यातून बेदखल केले जाऊ शकते. या प्रकरणी सर्वांनी २३ मार्च रोजी सुनावणीस हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान जमिनीवर कोणतेही बांधकाम करण्याची परवानगी नाकारण्यात आली आहे. उत्तर आले नाही तर न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येणार आहे. आता भगवान शंकर उपस्थित राहतात की नाही हे वेळच ठरवणार आहे.
दहा दिवसांची मुदत
नोटीस जारी करणारे नायब तहसीलदार विक्रांत सिंह ठाकूर म्हणाले, की न्यायालयाच्या दिशानिर्देशांनंतर ही कारवाई केली जात आहे. जमीन बेकायदेशीररित्या बळकावल्याचे हे प्रकरण आहे. दाखल याचिकेत १६ जणांनी जमिनीचा ताबा घेतल्याचे नमूद करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात १० जणांची नावे समोर आली आहेत. त्यामध्ये एक नाव शिव मंदिराचेही आहे. सर्वांना नोटीस जारी करून दहा दिवसांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.