ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) – येथील एका १६ वर्षीय युवकाने चांगला डान्सर होता येत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. परंतु त्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यात त्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच म्युझिक व्हिडिओ बनविण्याची गळ घातली आहे. त्यामुळे त्याच्या या अंतिम इच्छेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहितानुसार, किशोर हा इयत्ता अकरावीत शिक्षण घेत आहे. ग्वाल्हेर शहरातील तो रहिवासी आहे. किशोरने रात्रीच्या सुमारास रेल्वेतून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या जवळ एक सुसाईड नोट सापडली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, तो एक चांगला डान्सर बनू शकत नाही. कारण त्याचे कुटुंब आणि मित्र त्याला पाठिंबा देत नाहीत. तसेच त्याने मोदींकडे त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, माझ्या मृत्यूनंतर, एक म्युझिक व्हिडीओ बनवावा. त्यामध्ये अरिजीत सिंग हा गाण्याचे गायन करेल. आणि नेपाळी कलाकार सुशांत खत्री हा नृत्य करेल. तसेच हा म्युझिक व्हिडिओ माझ्या आत्म्याला शांती देईल. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.