मुकुंद बाविस्कर, इंडिया दर्पण वृत्तसेवा
माहिती तंत्रज्ञान युगात वेगवेगळे नवीन शोध लागत असताना विशेषतः मोबाईल जगतात तर सध्या प्रचंड वेगाने क्रांती घडत असल्याचे दिसून येते. त्यामुळेच यापुढे मोबाईल मध्ये सिम कार्ड साठी जागाच नसेल, त्याऐवजी ही सिम कार्ड मोबाईल तयार करतानाच त्यामध्ये ई सिम कार्डची सुविधा देण्यात येईल, त्यामुळे सिम कार्ड बदलण्याची गरज पडणार नाही. या संदर्भात ॲपल कंपनीने ही आगळीवेगळी घोषणा केली असून अनेक सुविधांचा लाभ मिळणार आहे. परंतु त्याचबरोबर काही तोटे ही होण्याची शक्यता आहे. अर्थात सध्या तरी ही सुविधा अमेरिकेत असून भारतात येण्यासाठी त्याला खूप वाट पाहावी लागणार आहे.
ॲपल कंपनीने आयफोनच्या १४ एडीशनची घोषणा करताना त्यातून सिम कार्ड हद्दपार केल्याचे जाहीर केले असून अमेरिकेत निर्माण केल्या जाणाऱ्या आयफोन १४मध्ये सिम कार्डसाठी जागा ठेवली नसल्याचेही सांगितले. मात्र त्याऐवजी या आयफोनमध्ये एकाच वेळी आठ ‘ई सिम’ ठेवण्याची सुविधा देण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
सध्या ॲपलच्या नव्या आयफोनच्या अमेरिकेतील एडीशनमधून प्रायोगिक तत्वावर सिम कार्डची जागा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यामध्ये आठ ई-सिम प्रोफाइल कार्यान्वित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे मोबाईल वापरकर्त्या ग्राहकाला एका आयफोनवरून एकाच वेळी आठ नंबर मिळण्याची सोय असेल. परंतु एका वेळी केवळ दोनच ई-सिम त्याला सक्रिय ठेवता येतील.
यात प्रत्यक्ष सिम कार्डऐवजी डिजिटली जतन करून मोबाइल सेवा वापरण्याची सुविधा ई-सिम देते. ‘ई-सिम’ हा ‘एम्बेडेड सिम’ असा या शब्दाचा अर्थ आहे. यात बाहेरून प्लास्टिकचे सिम कार्ड बसवण्यासाठी जागा दिलेली नसते. मोबाइलच्या हार्डवेअरमध्येच सिम कार्डच्या चिपचा अंतर्भाव करण्यात आलेला असतो. कोणत्याही मोबाइल सेवापुरवठादाराची सेवा घेऊन या चिपद्वारे ई-सिम कार्यान्वित करण्यात येतो. तसेच मोबाइल सेवा बदलायची झाल्यास नवीन सिम कार्ड बसवण्याच्या ऐवजी चिप ‘रिप्रोग्राम’ करून सेवा सक्रिय करता येऊ शकते.
हरवलेल्या मोबाइलचा शोध
ई-सिमचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ई-सिम मोबाइल सुरक्षिततेच्या दृष्टीनेही चांगले फायद्याचे आहे. मोबाइल चोरीला गेल्यास अथवा हरवल्यास अन्य व्यक्ती त्यातील सिम कार्ड काढून दुसरे सिमकार्ड टाकून मोबाइलचा वापर करू शकतात. मात्र, ई-सिम कार्यान्वित असलेल्या मोबाइलवर हे करणे शक्य नाही. शिवाय त्याद्वारे हरवलेल्या मोबाइलचा शोध घेणेही शक्य हाेऊ शकते.
तर मोबाईल बिनकामाचा
ई-सिम ही आकर्षक संकल्पना असली तरी, तिचे काही धोके आहेत. यातील पहिला धोका म्हणजे, अचानक मोबाइल खराब झाल्यास किंवा त्यातील डिस्प्ले चालेनासा झाल्यास मोबाइल पूर्णपणे संपर्कहीन किंवा बिनकामाचा ठरू शकतो. सध्या मात्र प्लास्टिकचे सिम कार्ड असल्यास ते काढून अन्य मोबाइलमध्ये टाकून त्याचा वापर करता येऊ शकतो. मात्र, ई-सिमची सेवा कार्यान्वित असल्यास हे करणे शक्य नाही.
अनेक देशात
ई सीमकार्डची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अनेक देशांत अजूनही ई-सिमला मान्यता नाही, तसेच त्याची सुरुवात ही झालेली नाही. वास्तविक ई-सिम सुविधा ही सुमारे १० वर्षापासून अस्तीवात आली आहे. मात्र, अजूनही ती प्रचलित झालेली नाही. अद्याप ही सुविधा काही निवडक व उच्च किंमत श्रेणीतील स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे. अमेरिकेत ही सुविधा असली तरी भारतात अशी सुविधा मोबाईल फोन मध्ये येण्यास आणखी बराच कालावधी जावा लागेल असे दिसून येते. मात्र सिमकार्डसाठीचा ‘स्लॉट’ कमी झाल्यास मोबाइल निर्मात्या कंपन्या आणि मोबाइल सेवा पुरवठादार कंपन्यांचा निर्मितीखर्च कमी होणार आहे.
Technology Tips Mobile Sim Card Alternative