इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – नवीन तंत्रज्ञान पुढे येते आणि अल्पावधित जगात ते वापरलेही जाते. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. पण, सध्या चॅट जीपीटीची चर्चा फारच जोरात सुरू आहे. अनेकजण माहिती विश्वातील हा जुदूई दिवा असल्याचा उल्लेखही करीत आहे. हे तंत्रज्ञान नेमके काय? याचा आढावा घेणार आहोत.
डिजिटल साधने आणि संगणकनियंत्रित यंत्रमानवही आपल्यासारखीच बुद्धी वापरू शकतील, अशी अशक्यप्राय वाटणारी व्यवस्था या तंत्रज्ञानाने निर्माण केली आहे. चॅट-जीपीटी या तंत्रज्ञानावर आधारीत ताजे आविष्कार आहे. आपली बुद्धी विचारेल, अशा हरेक प्रश्नाची चुटकीसरशी, मुद्देसूद आणि सुसंगत उत्तरे देऊ शकणारी कृत्रिम बुद्धी म्हणून नुकताच हा आविष्कार आपल्या सेवेत दाखल झाला आहे.
अवघे सायबर विश्वच व्यापणार
डिजिटल तंत्रज्ञानातील प्रगतीचा हा नवा टप्पा चॅटबॉट प्रणालीच्या स्वरूपातील आहे. लिखित अथवा वाचिक मानवी संवादाचे हुबेहूब अनुकरण हे चॅटबॉटचे प्राथमिक कार्य. चॅट-जीपीटी (जनरेटिव्ह प्री-ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर- जीपीटी) हा सर्वात ताजा आणि नावीन्यपूर्ण बॉट आता या क्षेत्रात खळबळजनक क्रांती करू पाहत आहे. सॅन फ्रान्सिस्कोस्थित ओपन एआय या कंपनीने तो उपलब्ध करून दिला आहे. नोव्हेंबर २०२२मध्ये प्रसृत केले गेलेले हे तंत्रज्ञान अवघे सायबरविश्व व्यापण्याच्या दिशेने झपाटय़ाने पावले टाकत आहे.
चॅटबॉटची पार्श्वभूमी
जीपीटीमुळे बॉट हा शब्द अचानक सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा ठरत असला, तरी ही प्रणाली काही अगदी नवी नाही. २०१६मध्ये मायक्रोसॉफ्ट कंपनीने या नावाचा बॉट तयार केला होता आणि अगदी अलीकडे, ऑगस्ट २०२२मध्ये मेटा कंपनीने ब्लेंडरबॉट नावाची प्रणाली प्रसृत केली होती. परंतु या प्रणाली सर्वमान्य ठरल्या नाहीत. चॅट-जीपीटी मात्र तशी मान्यता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चॅट-जीपीटी समोर येऊन पाच दिवस उलटत नाही तोच या प्रणालीने दहा लाख सबस्क्राइबर्सचा टप्पा गाठला. प्रश्नकर्त्यांचा हेतू जाणून त्यानुरूप उपयुक्त, सत्याधारित व निर्धोक उत्तर देणे हे चॅट-जीपीटीचे वैशिष्ट्य आहे.
Technology Chat GPT Artificial Intelligence Information